Karnataka CM : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत काँग्रेसमध्ये (Congress) अजूनही चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे. तर, येत्या 48 ते 72 तासांत कर्नाटकात नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार असल्याचं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी म्हटलं आहे.


एएनआय वृत्तसंस्थेनुसार, कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी (17 मे) मीडियाशी बोलताना सांगितलं की, "सध्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत (मुख्यमंत्रिपदाबाबत) चर्चा सुरु आहे. काँग्रेस जेव्हा निर्णय घेईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू. येत्या 48-72 तासांत कर्नाटकात नवे मंत्रिमंडळ असेल."






दरम्यान कर्नाटकात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात चुरशीची लढत आहे. मात्र त्यात सिद्धरामय्या आघाडीवर असल्याचं कळतं. 


आमदारांकडून काँग्रेस अध्यक्षांना अधिकार


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 जागांसह दणदणीत विजय मिळवला. यानंतर, रविवारी (14 मे) बंगळुरुमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली ज्यामध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आणि मुख्यमंत्री निवडीचा अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या निरीक्षकांनी आमदारांचं मत जाणून घेतलं. यासाठी गुप्त मतदानही करण्यात आलं. खुद्द सिद्धरामय्या यांनाही गुप्त मतदान हवं होतं, असं सांगितलं जातं.


दुसऱ्या दिवशी, सोमवारी (15 मे) काँग्रेसच्या तिन्ही निरीक्षकांनी दिल्लीत जाऊन मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन त्यांना आमदारांचं मत सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांना अधिक आमदारांचा पाठिंबा होता, त्यामुळे त्यांची दावेदारी अधिक मजबूत झाली.


बैठकीच्या अनेक फेऱ्या


कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी अनेक बैठका झाल्या. मंगळवारी (16 मे) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तिथे सुमारे दीड तास दोघांमध्ये नावाबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतरच सिद्धरामय्या यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.


मंगळवारी संध्याकाळी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्यासाठी स्वतंत्रपणे दाखल झाले. पहिल्यांदा डीके शिवकुमार भेटायला आले आणि ते गेल्यानंतर सिद्धरामय्या त्यांना भेटले.