परदेशात जाण्यासाठी तन्वी सेठ आणि अनस सिद्दीकी या दाम्पत्याने पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. पासपोर्ट कार्यालयाकडून त्यांना मुलाखतीसाठीही बोलावलं. मुलाखतीदरम्यान लखनौ पासपोर्ट कार्यलयाचा अधीक्षक विकास मिश्र, तन्वी सेठ यांना म्हणाला की, तुमच्या प्रकरणात अडचणी आहेत. तुम्ही मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केलं आहे तर तुमचं नाव तन्वी सेठ कसं काय असू शकतं? नाव बदलणं हे तुमचं कर्तव्य आहे.
तर अनसचा पासपोर्ट रिन्यू करायचा होता. पासपोर्ट अधीक्षक विकास मिश्रने अनसला धर्म बदलण्यासाठी सांगितलं. हिंदू धर्म स्वीकारुन पत्नीसोबत सात फेरे घ्या, असं कर्मचाऱ्याने अनसला सांगितलं.
तन्वी सेठ आणि अनस सिद्दीकी यांचं 2007 मध्ये लग्न झालं होतं. त्यांना सहा वर्षांची एक मुलगीही आहे. "बुधवारी आम्ही तिघे पासपोर्स बनवण्यासाठी कार्यालयात गेले होतो. सुरुवातीच्या दोन फेरीत (ए आणि बी) आमची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली. पण तिसऱ्या काऊंटरवर पासपोर्ट अधीक्षक विकास मिश्र यांच्याकडे गेले असता, त्यांनी धर्मावरुन अपमानित केलं, असा आरोप तन्वी सेठ यांनी केला आहे.
"या प्रकरणात कार्यालयातील कोणीही आमची मदत केली नाही," असा आरोप विकास आणि तन्वीने केला आहे. तन्वी यांच्या आरोपानुसार, "तिथे उपस्थित काही कर्मचारीही माझी खिल्ली उडवू लागले. पण काऊंटर सी-5 वर पोहोचले असता परिस्थिती आणखीच बिघडली. विकास मिश्रने माझी कागदपत्रे पाहिल्यानंतर मुस्लीम व्यक्तीशी लग्नाबाब प्रश्न विचारणं सुरु केले."
विकास मिश्रने केलेल्या गैरवर्तनानंतर अखेर दोघांनी ट्वीट करुन पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे तक्रार केली. लखनौच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. दोषीविरोधात कठोर कारवाई होईल, असं कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान या प्रकरणातील आरोपी पासपोर्ट अधीक्षक विकास मिश्रची बदली करण्यात आली आहे. तर तन्वी आणि अनसला पासपोर्ट मिळाला आहे.