मुबई :  जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. देशभरात यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहरादूनमध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत योगासने करुन योग दिन साजरा केला.


देहरादूनच्या वन संशोधन संस्थेत योग दिनानिमित्त देशातील सर्वात मोठा कार्यक्रम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमात जवळजवळ 55 हजार जणांचा सहभाग झाला आहे. तसेच जगातला प्रत्येक नागरिक योगाला आपलंसं करत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली.

याशिवाय योगदिनानिमित्त राज्यभरात कार्यक्रम होणार आहेत. राजस्थानच्या कोटामध्ये योगगुरू बाबा रामदेव २ लाख नागरिकांसोबत योग करणार आहेत. यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील उपस्थितीत होत्या. 2 लाख जण एकत्रित योगा करत असल्याची ही पहिलीच वेळ असल्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची टीमही या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा या भारताच्या मागणीला संयुक्त राष्ट्रानं 2014 मध्ये मान्यता दिली. त्यानंतर 2015 पासून 21 जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जातो. भारतातही सर्वसामान्यांसह राजकीय नेतेही योग दिन साजरा करतात. याशिवाय भारतीय दूतावासांच्या समन्वयातून 150 देशांमध्येही योगदिनाचे कार्यक्रम राबवले जात आहेत.