मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त काल अलीगढमध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी मुलींना कट्यार, चाकू अशा वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ही शस्त्रं दिल्याचं हिंदू महासभेच्या पूजा पांडेने म्हटलं आहे. पूजा पांडेच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आठवड्यातून 2 वेळेला या मुलींना हिंदू महासभेकडून शस्त्रं चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. वर्षभरापूर्वी गांधी जंयत्तीनिमित्त याच पूजा पांडेने महात्मा गांधीजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या मारण्याचं कृत्य केलं होतं. पूजा पांडे ही हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव आहे.

इथे कट्यार आणि चाकू वाटपामुळे कुणी घाबरत असेल, तर त्याची गरज नाही. जेल आपल्यासाठी कारागृह नाही तर तीर्थक्षेत्र आहे.  सावरकर, नथुराम गोडसेसारखे आदर्श आपण मानतो. आपल्या क्रांतीविरांनीही जेलवारी केली आहे. त्यामुळे आपण त्याला घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया पूजा पांडेने दिली आहे.

सुरीबरोबरच मुलांना भगवदगीतेच्या प्रतीचे देखील वाटप करण्यात आले आहे. कारण, परीक्षांमध्ये चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होणाऱ्या मुलांना हे जाणून घ्यायचे आहे की, या शस्त्राचा वापर कधी आणि कसा करायचा आहे. मला केवळ त्यांना आपल्या मुली-बहिणी किंवा कुटुंबातील सदस्यांचे रक्षण करण्यासाठी ते बळकट आणि सक्षम असल्याची जाणीव करून द्यायची आहे, असेही पूजा पांडेने म्हटले आहे.



राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करणे सावरकरांचे स्वप्न होते.  मोदींनी लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश संपादन करून सावरकरांचे पहिले स्वप्न पूर्ण केले आहे. आता आम्ही या सुऱ्यांचं वाटप करत त्यांचे दुसरे स्वप्न पूर्ण करत आहोत, असे हिंदू महासभेचे प्रवक्ते अशोक पांडे यांनी म्हटले आहे. जर हिंदूंना स्वतःचे आणि देशाचे संरक्षण करायचे असेल तर त्यांना हत्यारांचा वापर करणे शिकावे लागेल, असेही पांडे म्हणाले.