नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मरण पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. उद्या(ता. 30) संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.


लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना पाहायला मिळाल्या. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये जवळपास 50 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे.


लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमधील 42 पैकी 18 जागा भाजपने जिंकल्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पश्चिम बंगालमध्ये फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. लोकसभा प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी आणि मोदी यांच्यात बरेच आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र हा एक औपचारिक कार्यक्रम असल्याने आपण या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं ममता यांनी म्हटलं आहे.