कुल्लू : हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातील बस अपघातामधील मृतांचा आकडा वाढला आहे. खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. कुल्लूमधील बंजार परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


दरीत कोसळताच बसचा चक्काचूर झाला. बसमधील बहुतांश प्रवासी कॉलेज विद्यार्थी होते, जे अॅडमिशन घेऊन परत येत होते. काल संध्याकाळपर्यंत बंजार जिल्हाधिकाऱ्यांनी 33 प्रवाशांच्या मृत्यूला दुजोरा दिला होता. परंतु रात्री उशिरा मृतांचा आकडा 44 वर पोहोचला.

कुल्लू पोलीस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस कुल्लूवरुन गाडागुशैणीकडे जात होती. बंजारपासून एक किमी पुढे भियोठ वळणावर ही बस 500 फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये सुमारे 60 ते 70 जण प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने पोलिस आणि बचाव पथकाने बचाव कार्य सुरु आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करताना ट्वीट केलं आहे की, "कुल्लू, हिमाचल प्रदेशमधील बस दुर्घटनेमुळे अतिशय दु:ख झालं. मृतांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. तर जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो."


पंतप्रधान कार्यालयाने नरेंद्र मोदी यांच्यावतीने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "कुल्लूमधील दुर्घटनेमुळे फार दु:खी आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो. तर जखमीच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो. हिमाचल प्रदेश सरकार सर्व प्रकारे शक्य तेवढी मदत करत आहे."

तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही बस अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, "हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथील बस दुर्घटना दु:खद आहे. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे."


अपघातवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह आणि इतर नेत्यांनीही ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे.