नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना जोरदार धक्का बसला आहे. तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) सहा पैकी चार राज्यसभा खासदार भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये वायएस चौधरी, सीएम रमेश, टीजी वेंकटेश आणि जीएम राव या खासदारांचा समावेश आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी या चारही खासदारांनी राज्यसभाचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी चिट्ठी लिहून टीडीपी सोडत असल्याची माहिती दिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकासाचं मॉडेल आणि विविध योजना यांना आपण प्रभावित झालो असून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आपण भाजपमध्ये सहभागी होत असल्याचं या खासदारांनी म्हटलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत तीन खासदार भाजपमध्ये सहभागी झाले तर एका खासदाराने पत्र पाठवलं आहे.





देशाचा मूड लक्षात घेऊन आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आलो आहोत. यापुढे देखील आम्ही आंध्र प्रदेशच्या हितासाठी आवाज उठवत राहू, असं खासदार वायएस चौधरी यांनी म्हटलं. या चार खासदारांच्या प्रवेशामुळे यामुळे भाजपचं राज्यसभेतील खासदारांच संख्याबळ आता 75 वर पोहोचलं आहे. तर एनडीएच्या खासदारांची संख्या 107 झाली आहे.


आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आणि राज्याच्या हिताच्या मुद्द्यावर आम्ही भाजपाशी लढा दिला. त्यासाठी आम्ही केंद्रातील मंत्रिपदांचाही विचार केला नाही. टीडीपीला दुर्बल बनवण्यासाठी भाजपाने केलेल्या प्रयत्नांचा मी निषेध करतो. असे धक्के पक्षासाठी नवे नाहीत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांची घाबरण्याची गरज नाही, असं चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.