Hijab Row : कर्नाटकातील हिजाबच्या वादानंतर आता राज्य सरकारने महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी याबाबत माहिती दिली आहे. 16 फेब्रुवारीपासून कनिष्ठ महाविद्यालये आणि पदवी महाविद्यालये पुन्हा सुरू केली जातील,असे शिक्षण मंत्री नागेश यांनी सांगितले. दरम्यान, 14 फेब्रुवारीपासून कर्नाटकात 10 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 


काही विद्यार्थिनींनी हिजाब परिधान केल्यामुळे त्यांना शैक्षणिक संस्थेत प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे सरकारने शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.


कर्नाटकात सोमवारपासून दहावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, मंड्या जिल्ह्यातील एका शाळेच्या प्रवेशद्वारावर, हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. हिजाब काढल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात आला. याबाबत अनेक विद्यार्थिनींचे पालक आणि शाळेचे अधिकारी यांच्यात वादावादीही झाली.  


दरम्यान, गेल्या आठवड्यात कर्नाटक उच्च न्यायालयाने या वादावर अंतरिम आदेश दिला होता. त्यानुसार राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरू करता येतील, परंतु विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कोणत्याही प्रकारचे धार्मिक कपडे घालून शाळेत जाऊ शकत नाहीत. 


हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला होता. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये 6 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते. त्यावेळीपासून हा मुद्दा सध्या देशभर चर्चेत आहे. काही लोक त्याचे समर्थन करत आहेत, तर काही लोक विरोध करत आहेत.


महत्वाच्या बातम्या