Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) प्रत्येक मुद्द्यावर आपले मत बेधडकपणाने मांडण्यासाठी ओळखली जाते. सध्या कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरून वाद सुरू आहे. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. जावेद अख्तर आणि स्वरा भास्करसह अनेक सेलिब्रिटींनी यावर आपलं मत व्यक्त केलं असून, आता त्यात कंगना रनौतचं नावही सामील झालं आहे. तिने या मुद्द्यावर एक जोरदार पोस्ट शेअर केली होती, जी व्हायरल होत आहे. कंगनाची ही स्टोरी आता मात्र दिसणार नाहीये.  


तिच्या स्टोरीमध्ये तिने इराणमधील 'बुरखा टू बिकिनी'चा फोटो शेअर करत 'हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानात बुरखा न घालता फिरून दाखवा' असे म्हटले होते.


कंगना रनौतने या प्रकरणावर आपले मत स्पष्टपणे शेअर करत इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, 'जर तुम्हाला हिंमत दाखवायची असेल, तर अफगाणिस्तानात बुरखा घालू नका. मुक्त व्हायला शिका, स्वतःला पिंजऱ्यात ठेवू नका.' अभिनेत्रीने लेखक आनंद रंगनाथन यांनी शेअर केलेली पोस्ट पुन्हा शेअर केली. या पोस्टमध्ये शाळांमध्ये धार्मिक ड्रेस कोडवर बंदी घालण्याच्या बाजूने सक्रियपणे बोलले गेले आहे आणि या प्रथेला 'कठोर, स्त्रीविरोधी आणि अत्याचारी' म्हटले आहे.


 



कंगनाची पोस्ट


कंगनाच्या शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, ‘इराण. 1973 आणि आता. 50 वर्षांच्या कालावधीत बिकिनीपासून बुरख्यापर्यंत. जे इतिहासातून काही शिकत नाहीत, ते त्याची पुनरावृत्ती करतात.’ यात स्त्रियांच्या दोन वेगवेगळ्या प्रतिमा आणि 50 वर्षांतील फरक दाखवला आहे. एका फोटोत महिलांनी बिकिनी घातली आहे, तर दुसऱ्या फोटोत बुरखा.


नेमकं प्रकरण काय?


हिजाब परिधान केल्यामुळे त्यांना वर्गात जाऊ दिले जात नसल्याचा आरोप उडुपी येथील सरकारी गर्ल्स पीयू कॉलेजच्या काही विद्यार्थिनींनी केल्यानंतर कर्नाटकात गेल्या महिन्यात निदर्शने सुरू झाली. तेव्हापासून राज्यात अनेक ठिकाणी अशांततेच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, पुरुषांचा एका गट बुरख्यातील महिला विद्यार्थिनीकडे जात घोषणाबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावर टीका देखील झाली. कमल हसन, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, हेमा मालिनी आणि जावेद अख्तर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी याबाबत मत व्यक्त केले आहे.


वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, कंगना शेवट 'थलायवी' या चित्रपटात दिसली होती. 'तेजस' आणि 'धाकड' हे तिचे आगामी चित्रपट आहेत. याशिवाय ती 'मणिकर्णिका रिटर्न्स'मध्येही दिसणार आहे. कंगना आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पदार्पण करणार आहे, ज्याबद्दल ती सध्या चर्चेत आहे. ती एकता कपूरचा शो 'लॉकअप' होस्ट करणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha