PM Modi Speech : कोरोना लसीकरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक मोठी घोषणा केली. देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, सोमवार 21 जूनपासून देशातील प्रत्येक राज्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना भारत सरकार राज्यांना मोफत लस देईल. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. देशातील 80 कोटीना नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांतील ठळक मुद्दे



  • देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला लसीकरणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही.  लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. 


 



  • देशात तयार होत असलेल्या लसीपैकी 25 टक्के लस खासगी क्षेत्रातील रुग्णालये थेट घेऊ शकतात, ही यंत्रणा सुरूच राहिल. खासगी रुग्णालये लसीच्या निश्चित किंमतीनंतर एका डोससाठी जास्तीत जास्त 150 रुपये शुल्क आकारू शकतील. त्यावर लक्ष ठेवण्याचे काम राज्य सरकारांकडे राहील.


 



  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, जे लोक लसीबद्दल संशय निर्माण करत आहेत आणि अफवा पसरवत आहेत ते निरपराध नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. अशा अफवांबद्दल सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.


 



  • देशातील लहान मुलांसाठी दोन लस तयार करण्यात येत असून त्यावर काम सुरू असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारताकडे सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन स्वदेशी लसी आहेत. सोबतच नाकातून लस देण्याचा प्रयत्न सुरू असून नेजल स्प्रे व्हॅक्सिनवर काम सुरू आहे. यामध्ये यश मिळालं तर देशात वेगाने लसीकरण होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


 



  • पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत पुढे वाढवली जाणार आहे.. या महामारीच्या काळात गरिबांच्या प्रत्येक गरजा लक्षात घेत, सरकार त्यांच्यासोबत उभे आहे. देशातील नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत 80 कोटीहून अधिक देशवासीयांना दर महिन्याला नि:शुल्क अन्नधान्य निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल. गेल्या वर्षी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार 8 महिने मोफत धान्य नागरिकांना पुरवण्यात आलं होतं. 


 



  • गेल्या शंभर वर्षातील ही सर्वात मोठी महामारी आहे,. आधुनिक जगाने असा साथीचा रोग कधी पाहिलेला किंवा अनुभवला नव्हता. आपल्या देशाने अशा मोठ्या जागतिक साथीसह बर्‍याच आघाड्यांवर एकत्र लढा दिला आहे. एप्रिल आणि मे महिन्यांच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारतात वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी  मोठ्या प्रमाणात वाढली होती. भारताच्या इतिहासात कधीही इतक्या प्रमाणात वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भासली नव्हती. ही गरज भागवण्यासाठी युद्धपातळीवर काम केले गेले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 


 



  • आज संपूर्ण जगात लसीच्या मागणीच्या तुलनेत लस उत्पादक देश आणि ही लस बनविणार्‍या कंपन्या खूप कमी आहेत. कल्पना करा की जर आपल्याकडे आता भारतात लस तयार झाली नसती तर भारतासारख्या विशाल देशात काय झाले असते? मागील  50-60 वर्षांचा इतिहास पाहिला तर तुम्हाला कळेल की परदेशातून लस घेण्यासाठी भारताला अनेक दशके लागत होती. परदेशात लसीचे काम पूर्ण झाले तरीही आपल्या देशात लसीकरणाचे काम सुरू होऊ शकत नव्हते. 2014 मध्ये जेव्हा देशवासीयांनी आम्हाला सेवा देण्याची संधी दिली तेव्हा भारतात लसीकरणाचा वेग 60 टक्के होता. आमच्या मते ही चिंतेची बाब होती. भारताच्या लसीकरण ज्या वेगाने सुरू आहे त्यानुसार, लसीकरणाच्या 100 टक्के व्याप्तीचे लक्ष्य गाठायला देशाला सुमारे 40 वर्षे लागतील. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही मिशन इंद्रधनुष सुरू केले, अशी माहिती पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दिली. 


 



  • भारतात आजपर्यंत 23  कोटींपेक्षा जास्त कोरोना लसींचे डोस दिले गेले आहेत. देश बर्‍याच काळापासून करीत असलेल्या निरंतर प्रयत्न व परिश्रमांमुळे आगामी काळात लसींचा पुरवठा आणखी वाढणार आहे. आज देशातील 7 कंपन्या लस तयार करत आहेत. आणखी तीन लसींची अॅडव्हान्स स्टेजवर सुरू आहे. लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी, परदेशी कंपन्यांकडून लसींची खरेदी त्वरित करण्यात आली आहे. मुलांसाठी लसीची चाचपणीही सुरू आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.