नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ..भाजपसाठी हिंदुत्वाचा चेहरा..यूपीच्या बाहेर इतर राज्यांत होणाऱ्या निवडणुकांतही योगींच्या प्रचारसभांना त्यामुळेच अधिक मागणी असते. पण आता स्वत:च्याच राज्यात योगींचं स्थान काहीसं डळमळीत होताना दिसलं..2022 च्या विधानसभा निवडणुका योगींच्या नेतृत्वातच लढायच्या की नाही याबाबत मंथन करण्याची वेळ आली होती.. अखेर भाजप हायकमांडनं  उत्तर प्रदेशच्या निवडणुका भाजप अखेर योगी आदित्यनाथ यांच्याच चेहऱ्यावर लढणार असल्याचा निर्णय घेतलाय.


दिल्ली-लखनौ-दिल्ली अशा एकावर एक बैठका झाल्यावर अखेर उत्तर प्रदेशात बदलाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं दिसतंय. उत्तर प्रदेशातल्या कोविड हाताळणीवरुन उपस्थित झालेले प्रश्न, गंगा किनाऱ्यावरच्या तरंगत्या मृतदेहांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली बदनामी आणि मोदींचे अत्यंत विश्वासू अधिकारी ए के शर्मा यांची उत्तर प्रदेशच्या राजकारणातली एन्ट्री यामुळे योगी आदित्यनाथ यांच्याबाबत या चर्चांना उधाण आलं होतं. 


गेल्या आठवडाभरात दिल्ली- लखनौमध्ये उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकांबाबत भाजप संघाच्या महत्वाच्या बैठका पार पडल्या. उत्तर प्रदेशचा रिपोर्ट घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे हे लखनौमध्ये गेले होते.त्यानंतर संघटन महामंत्री बी एल संतोषही पोहचले होते. दिल्लीत संघाचं महामंथन झालं. काल भाजप महासचिवांसोबत अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही एक बैठक झाली. या बैठकीनंतर नड्डा हे पंतप्रधान मोदींच्याही निवासस्थानी पोहचले. त्याच बैठकीनंतर योगी आदित्यनाथ यांना जीवनदान मिळाल्याचं समजतंय. 


2017 ची यूपी निवडणूक भाजपनं कुठल्याही चेहऱ्याविना लढली. पण मुख्यमंत्री निवडायची वेळ आल्यानंतर भगव्या कपड्यात वावरणाऱ्या योगी आदित्यनाथ यांची निवड करुन मोदी-शाहांनी सगळ्यांनाच चकित केलं होतं. त्यानंतर योगींच्या लोकप्रियतेचा आलेख वाढत गेला. यूपी में रहना हैं, तो योगी योगी कहना हैं अशा घोषणांपर्यंत तो पोहचला. भाजपचे भविष्यातले पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणूनही योगींचं नाव येऊ लागलं.पण निवडणुकीला वर्ष उरलं नसतानाच योगींचे ग्रह बदलले. 


 योगींच्या बदलाची चर्चा मुळात सुरु का झाली? 


उत्तर प्रदेशात कोरोनाची हाताळणी, गंगा किनाऱ्यावरचे मृतदेह यामुळे सरकारची बदनामी झाली. अनेक आमदारांनी योगींच्या कार्यशैलीबाबतही हायकमांडकडे तक्रारी केल्या आहेत. शिवाय मोदींचे अत्यंत विश्वासू गुजरात कॅडरचे अधिकारी ए के शर्मा यांची यूपीच्या राजकारणात एन्ट्री झाली आहे.  ए के शर्मा यांना काही दिवसांपूर्वी भाजपनं विधानपरिषदेवर पाठवलं, त्यांना मंत्रिमंडळातही घेतलं जाईल याचीही चर्चा सुरु झाली. योगींना चेकमेट करण्यासाठीच मोदींनी आपला विश्वासू मोहरा यूपीत पाठवल्याची चर्चा, प्रशासकीय निर्णयांतही त्यांचा सहभाग वाढवला. 


 एकीकडे योगींना कायम ठेवलं जाणार का अशी चर्चा सुरु होती. त्याचवेळी शनिवारी 5 जूनला योगींचा 49 वा वाढदिवस आला. पण ना मोदींनी त्यांना जाहीर शुभेच्छा दिल्या, ना नड्डांनी, ना अमित शाहांनी...त्यामुळे हायकमांड योगींवर नाराज असल्याच्या चर्चा अजून रंगल्या होत्या. पण अर्थात यूपी भाजपनं या बातम्या फेटाळल्या. मोदींनी फोनवर शुभेच्छा दिल्याचा दावा त्यांनी केला. 


 उत्तर प्रदेश या एका राज्यातून लोकसभेचे 80 खासदार निवडले जातात.सत्यामुळे ते राखणं भाजपसाठी खूप महत्वाचं आहे. योगींना जीवनदान मिळालं असलं तरी या सगळ्या प्रक्रियेत त्यांचं राजकीय वजन मात्र कमी झालंय.भाजपच्या कुठल्याच मुख्यमंत्र्याला मोदी-शाहांच्या काळात सेटल होता आलेलं नाही. हेच योगींच्या उदाहरणातूनही दिसतंय.