लखनऊ : उत्तर प्रदेशात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या 'खाट सभा' या कार्यक्रमात खाटा कुणाच्या यावरुन खडाजंगी झाली.
राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी 'खाट पे चर्चा' कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला उपस्थितांनी बसण्यासाठी खाटा आणल्या गेल्या होत्या.
मात्र, सभेनंतर खाटा नेण्यसाठी पळापळ सुरु केल्यानं एकच खळबळ झाली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मते या खाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच आणल्या होत्या. मात्र लोकांनी नंतर त्या घरी नेण्याचा आग्रह धरल्यानं हा वाद सुरु झाला.
दरम्यान या सभेत राहुल गांधींनी शेतकऱ्यांची कर्ज आणि वीजबिल माफी करण्याची मागणी केली.
राहुल गांधींची ही किसान यात्रा उत्तर प्रदेशातील जनतेची मने आणि मते जिंकण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. या किसान यात्रेचा भाग म्हणून आजची खाट सभा आयोजित केली होती.
हा कार्यक्रम या यात्रेदरम्यान सर्व गावांमध्ये राबवण्यात येणार आहेत. 2500 किलोमीटरच्या या यात्रेत राहुल गांधी 39 जिल्हे आणि 233 विधानसभा क्षेत्रातून 9 ऑक्टोबरला दिल्लीत पोहोचणार आहेत.