मुंबई : रेल्वेतून प्रवास करताना जर तुमच्याकडे तिकिट नसेल तर दंडाऐवजी कन्फर्म तिकिट मिळू शकतं. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी प्रवाशांसाठी ही खूषखबर दिली आहे.
अनेकदा गडबडीत किंवा उशिर झाल्याने तिकिटाशिवाय प्रवास करावा लागतो. त्यावेळी तुम्ही टीसीकडून दंड देण्याऐवजी उपलब्ध असल्यास कन्फर्म तिकिट मिळवू शकाल. त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल.
ही सुविधा सध्या राजधानी, अर्चना सुपरफास्ट, गरीब रथ आणि लखनऊ मेल या रेल्वेमध्ये उपलब्ध असेल. लवकरच ही सुविधा सर्व प्रकारच्या रेल्वेमध्ये देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप कमी होऊन त्यांची चांगली सोय होणार आहे.
यापूर्वी विनातिकिट प्रवासासाठी दंड आणि प्रवासाची रक्कम प्रवाशांना द्यावी लागत होती. पण आता प्रवाशाकडे तिकिट नसेल तर टीसीशी संपर्क साधून तिकिट मिळवणे सोपे होणार आहे. विनातिकिट किंवा प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना होणारा मनस्ताप या सुविधेमुळे कमी होणार आहे.
या सुविधेचा भाग म्हणून रेल्वेतील टीसीकडे एक मशीन देण्यात येणार आहे. मशीनच्या माध्यमातून त्या रेल्वेतील आसनव्यवस्था, रिकामी जागा, कोणती सीट कुठल्या स्टेशनपर्यंत आरक्षित आहे हे कळणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशासोबतच रेल्वेलाही फायदा होणार आहे.