मुबंई : जेएनयूचा विद्यार्थी शारजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्यींनी उर्वशी चुडावालाला सशर्त अटींवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला. तसेच अटक झाल्यास 20 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिले आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तिनं चौकशीसाठी हजर रहावं, तसेच आपला पासपोर्ट आणि ड्युअल सिम मोबाईलही पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई आणि ठाण्याव्यतिरिक्त बाहेर जायचे असल्यास हायकोर्टाची परवानगी घेण्यात यावी. असे निर्देश देत अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 24 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.


या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं सरकारी वकिलांना विचारलं की, 'देशद्रोहाचा गुन्हा लावण्यापूर्वी हायकोर्टाच्या नियमाचं पालन झालं आहे का?, यावर नाही असं उत्तर देत कोणत्याही व्यक्तीविरूद्ध देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली (आयपीसी कलम 124 ए) गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी संबंधित जिल्हा कायदा (विधी )अधिकारी मतं घेणं अनिवार्य असतानाही इथं हे कलम लावण्यापूर्वी पोलीस अधिका-यांनी जिल्हा कायदा अधिका-यांशी चर्चा केलेली नसल्याची माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी आझाद मैदानमध्ये एलजीबीटीक्यू (समलैगिंक-बायसेक्शुअल-ट्रान्सजेन्डर–क्वीर) यांच्यावतीने आंदोलनं करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये चुडावाला यांनी 'शारजील तुझ स्वप्न आम्ही पूर्ण करु,' अशी घोषणाबाजी केली होती. त्यामुळे उर्वशीने देशद्रोहाचा आरोप असलेल्या आरोपीचे समर्थन केल्याचा आरोप ठेवत आझाद मैदान पोलीस स्थानकांत उर्वशीविरोधातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी उर्वशी चुडावाला यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानं त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. म्हणूनच अटक होण्याच्या भितीने चुडावाला यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आहे. न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्यासमोर मंगळवारी प्राथमिक सुनावणी पार पडली.

आझाद मैदानातील मोर्चामध्ये उर्वशीनं घोषणा दिल्या नसून केवळ दुस-यानं मोबाईलर पाठवलेला संदेश वाचला होता. त्यांचा इमामशी काही संबंध नाही, त्यामुळे तिच्यावरील देशद्रोहाचे आरोप चुकीचे असल्याचा दावा त्यांच्या वतीने करण्यात आला. मात्र चुडावाला यांनी आंदोलनाआधी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टही लिहिली होती, तसेच या आंदोलनामध्ये तिनं राष्ट्रविरोधी घोषणाबाजी केली, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. तसेच चुडावाला ही टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस) च्या विद्यार्थीनी असून येत्या शुक्रवारी त्यांची परीक्षा असल्यामुळे त्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणीही देसाई यांनी केली होती. दोन्ही पक्षकारंची बाजू ऐकून घेत उर्वशीने दिलेल्या घोषणांवरून तिची विचारधारा स्पष्ट होत नाही असे मतं नोंदवत हायकोर्टानं उर्वशी चुडावालाला सर्शत अटकपूर्व जामीन मंजूर केला.

WEB EXCLUSIVE | स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिल्या गेलेल्या कोलूच्या शिक्षेचा अनुभव आणि इतिहास पाहा



संबंधित बातम्या : 

भारताचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या शरजील इमामला अखेर बेड्या

मुंबई आयआयटीत राष्ट्रविरोधी घोषणा दिल्यास कारवाई होणार, हॉस्टेलची नवी नियमावली