पाटणा : भारताचे तुकडे करण्यासारखं वादग्रस्त आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ म्हणजेच जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अखेर अटक करण्यात आली. बिहारच्या जहानाबादमध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. शरजील इमाम हा दिल्लीतील शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या मुस्लीम महिलांच्या आंदोलनाचा सूत्रधार असल्याचं म्हटलं जात आहे.


अलिगढ मुस्लीम विद्यापीठात आसामला भारतापासून वेगळं करण्याचं प्रक्षोभक भाषण केल्यानंतर शरजील इमाम चर्चेत आला होता. याआधी पोलिसांनी त्याच्या भावालाही ताब्यात घेतलं होतं. या भाषणानंतर शरजील इमामवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यानंतर तो पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथकं तयार केली होती, ज्यांनी मुंबई, दिल्ली, पाटण्याच्या अनेक ठिकाणी छापा टाकला होता.

शरजीलचा वादग्रस्त व्हिडीओ
शरजील इमाम संदर्भात अनेक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जो व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल झाला आहे, त्यात पूर्वोत्तर राज्य, विशेषता: आसामला उर्वरित भारतापासून वेगळं (कमीत कमी एका महिन्यासाठी) करण्याचा उल्लेख आहे. या भाषणानंतर शरजील इमाम पसार झाला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध राज्यांमध्ये छापासत्र सुरु केलं होतं.

शरजील इमामविरोधात गुन्हा
शरजील इमामविरोधात दिल्ली पोलिसांनी भादविच्या कलम 124 अ, 153 अ आणि 505 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली होती. शिवाय अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील एका भाषणाप्रकरणी शनिवारी (25 जानेवारी) देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. आसाम पोलिसांनीही शरजीलच्या भाषणासंदर्भात त्याच्याविरोधात दहशतवाद विरोधी कायदा यूएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

कोण आहे शरजील इमाम?
- शरजील इमाम हा मूळचा बिहारच्या जहानाबादचा आहे.
- त्याने मुंबईतील आयआयटी पवईमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे.
- आयआयटी मुंबई ते बंगळुरु आणि कोपनहेगनमध्ये नोकरी केली आहे.
- सध्या जेएनयूमध्ये पीएचडी करत आहे
- सीएएविरोधात दिल्लीच्या शाहीन बाग परिसरातील आंदोलनाला मजबूद दिशा देण्यामागे त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातं.

शरजीलचे वडील जेडीयूचे नेते
शरजील इमामचं मूळ गाव बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील काको हे आहे. शरजीलचे वडील अकबर इमाम हे  जेडीयूचे नेते होते. काही वर्षांपूर्वी त्यांचं दीर्घआजाराने निधन झालं. ते विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय होते. अकबर इमाम यांनी 2005 मध्ये जहानाबाद मतदारसंघात जेडीयूच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र आरजेडीचे उमेदवार सच्चिदानंद राय यांच्याकडून अकबर इमाम यांचा 3000 पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला होता.