नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनणार आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सीएए-एनआरसी विरोधात दिल्लीत काही भागात आंदोलनं झाली. त्या सर्व सातही जागा आपने जिंकल्या आहेत.


ओखला मतदारसंघ


सर्वात महत्वाची ओखला मतदारसंघ, ज्या भागात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आहे, शाहीनबाग आंदोलन सुरु आहे, त्या ओखला मतदारसंघात आपचे सीटिंग आमदार अमानतुल्ला खान गेल्या वेळपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले आहेत. भाजपने अमानतुल्ला खान यांच्यावर हिंसा भडकवण्याचे आरोपही केले होते. त्या अमानतुल्ला खान त्यांना एकूण मतदानाच्या 81 टक्क्यांपेक्षा जास्त मतं पडली. त्यांच्या विरुद्धच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट गुल झालं. अमानतुल्ला यांना एक लाखांहून अधिकची आघाडी मिळाली आहे.


Delhi Election Result | स्वत:ला देशप्रेमी समजणाऱ्यांच्या मनातील भ्रमाचा भोपळा फुटला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


सीलमपूर मतदारसंघ


या भागात सीएए-एनआरसी आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. याठिकाणी जमाव पोलिसांच्या मागे लागला होता. ही जागा जिंकण्यास आम आदमी पक्षाला यश मिळालं. गेल्या वेळेपेक्षा या मतदारसंघात आपचं मताधिक्यही वाढलं. आपचे अब्दुल रहमान 36 हजार 920 मतांनी विजयी झाले.


मुस्तफाबाद मतदारसंघ


अत्यंत अटीतटीच्या लढतीत ही जागा आपने भाजपकडून हिसकावून घेतली. 20 व्या फेरीपर्यंत भाजपचे आमदार जगदीश प्रधान आघाडीवर होते. तेराव्या फेरीपर्यंत तर त्यांनी 30 हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या सहा फेऱ्यांमध्ये पारडं फिरलं आणि आपचे हाजी युनूस 20 हजार 704 मतांनी विजयी झाले.


Delhi Election Results | भाजपच्या पराभवाची मालिका थांबणार नाही : शरद पवार


माटिया महल मतदारसंघ


माटिया महल ही जागा आम आदमी पक्षाने गेल्या निवडणूकीत 26 हजार मतांनी जिंकली होती. यावेळी आपचे शोएब इक्बाल यांना 76 टक्के मतं मिळाली. शोएब इक्बाल याठिकाणी तब्बल 50 हजार 241 मतांनी विजयी झाले.


बल्लीमारण मतदारसंघ


आम आदमी पक्षाच्या इम्रान हुसैन यांनी जागा राखली. 36 हजारपेक्षा जास्त मताधिक्यांने ते विजयी झाले.


Delhi Election Result 2020 | दिल्लीत 'आप'ला एकाहाती कौल, 63 जागांवर आघाडी


कृष्णानगर मतदारसंघ


कृष्णानगर मतदारसंघात आपचे उमेदवार एसके बग्गा 4 हजार मतांनी विजयी झाले आहेत. अत्यंत अटीतटीच्या लढतीत शेवटच्या दोन राऊंडमध्ये आपने ही जागा राखली. आपच्या एस के बग्गा यांना 71 हजार 936 मतं पडली, तर भाजपच्या डॉ.अनिल गोयल यांना 67 हजार 809 मतं पडली.


Delhi Election Results | दिल्लीत 'आप'च बाप, भाजप आणि काँग्रेस साफ! माझा विशेष