Delhi Violence : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंती मिरवणुकीत झालेल्या गोंधळामुळे उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. धार्मिक स्थळं आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी अधिक गस्त वाढवण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांतील पोलीस प्रशासनाला अधिक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज अयोध्येत 84 कोशी यात्रा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस प्रशासनाला विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


नवी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंती मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर सध्या उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिसरात राहून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी नवी दिल्लीजवळच्या जिल्ह्यांमध्ये विशेष सर्तकतेच्या सूचना दिल्या आहेत आणि सर्व अधिकाऱ्यांना फिल्डमध्ये राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नवी दिल्ली पोलिसांना आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी माहिती दिली की, गेल्या साडेपाच वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये जातीय तणावाची एकही घटना घडलेली नाही.


हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. यादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मिरवणुकीत लोकांवर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेशल सेल आणि क्राईम ब्रांच या प्रकरणाची चौकशी करेल. चौकशीसाठी 10 पथकं तैनात करण्यात आली आहेत.


संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला
अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशल सिनेमाजवळ सायंकाळी साडेपाच ते साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दिल्लीच्या मध्य जिल्हा आणि ईशान्य जिल्ह्यात जिथे दिल्ली दंगल झाली तिथे मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या दंगलीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दिल्लीत अलर्ट जारी केला आहे, तर संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha