Menstruation: महिलांच्या मासिक पाळीबद्दल देशात अनेक चर्चा झडतात. मात्र, या चर्चा शहरी आणि एका विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित राहतात का, अशी शंका निर्माण करणाऱ्या घटना अवतीभवती घडत असतात. काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीला मासिक पाळीमुळे रक्तस्त्राव झाल्याने तिच्या भावाने तिची हत्या केली होती. आपल्या बहिणीने लैंगिक संबंध ठेवले असावे असा संशय आरोपीला आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे देशातील 71 टक्के मुलींना मासिक पाळीबाबत काहीच कल्पना नाही, असे एका पाहणीतून समोर आले होते. 


भारतात मासिक पाळीमुळे होणारे भेदभाव आणि इतर प्रथांमुळे होणाऱ्या अनेक घटना समोर येतात. मासिक पाळीबाबत फक्त मुलीच नव्हे तर पुरुषांमध्येही जागरुकता यावी यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी 15 जून रोजी 'युनेस्को'ने दिल्लीत मासिक पाळी आणि आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता यावर स्पॉट लाइट रेड (#Spot light Red) या नावाने मोहीम सुरू केली आहे. 


या मोहिमेचा उद्देश काय आहे


मासिक पाळीमुळे मुलींनी शिक्षण अर्धवट सोडू नये हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेतील भागीदार, P&G चे उपाध्यक्ष गिरीश कल्याणरामन म्हणाले, “भारतातील तरुण मुलींना कोणतेही संकोच न करता त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. याशिवाय या मोहिमेअंतर्गत आम्ही मुलींना पीरियड्सबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून पीरियड्स आल्यानंतर त्यांना कोणत्या तरी भीतीने शाळा सोडावी लागू नये. 


मासिक पाळी म्हणजे काय?


मासिक पाळी हा आजार नसून नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. महिलांना महिन्यातून एकदा मासिक पाळी येते. हे चक्र सरासरी 28 दिवसांचे असते. डॉक्टरांच्या मते, महिलांना 21 ते 35 दिवसांत कधीही मासिक पाळी येऊ शकते. मासिक पाळीच्या काळात स्त्रीच्या गर्भाशयातून रक्त बाहेर येते.


जर एखाद्या मुलीला मासिक पाळी येण्यास सुरुवात झाली तर त्याचा अर्थ असा होतो की तिचे शरीर गर्भधारणेसाठी तयार होण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. हे स्त्री शरीरातील हार्मोनल बदल देखील स्पष्ट करते. ज्याला मासिक पाळीपूर्वीची समस्या म्हणतात. या हार्मोनल बदलाला इंग्रजी भाषेत PMS किंवा Pre-menstrual syndrome म्हणतात.


वैद्यकीय शास्त्रानुसार मासिक पाळी दरम्यान महिलेच्या शरीरात 200 प्रकारचे बदल होऊ शकतात. ज्यामध्ये मुलींच्या भावना खूप वेगाने बदलत असतात. त्यांची चिडचिड वाढते. 


मासिक पाळीमुळे मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर...


एक सामाजिक संस्था 'दसरा' ने 2019 मध्ये प्रकाशित केलेल्या एका अहवालात दर वर्षी 2.36 कोटी मुली मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता आणि  इतर कारणांनी शाळा सोडून देतात. काही स्वयंसेवी संस्थांच्या दाव्यानुसार, शाळांमध्ये शौचालय, स्वच्छ पाणी  आदी सारख्या मूलभूत सुविधा नसल्याने शाळेत मुलींच्या अडचणीत वाढ होत असते. 


चाइल्ड स्पेशालिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ अपर्णा कुमारी यांनी 'एबीपी'सोबत बोलताना सांगितले की, 'बहुतेक प्रकरणांमध्ये मुलींना मासिक पाळी येईपर्यंत याबद्दल कोणतीही माहिती नसते. कधी कधी असे रुग्णही आमच्याकडे येतात जे म्हणतात की पहिल्यांदाच त्यांना मासिक पाळी येणे एखाद्या गंभीर आजारासारखे वाटते. बहुतेक मुलींना त्यांच्या मैत्रिणींकडून मासिक पाळीबद्दल माहिती मिळते, अर्धी अपूर्ण माहिती असते. 


पुरुषांची जबाबदारी... 


अपर्णा कुमारी यांनी म्हटले की, मासिक पाळीच्या दिवसात महिलांच्या शरिरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होतो. त्यामुळे महिलांना अशक्त वाटणे, मूड स्विंग होणे, चिडचिड होणे आदी त्रास जाणवू शकतो. त्यामुळे घरातील पुरुष मंडळींनी महिलांच्या मासिक पाळीच्या दिवसात त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. या काळात महिलांना दैनंदिन कामात मदतीची अधिक आवश्यकता असते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.