Friendship Day : मैत्रीचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असल्याचं सांगण्यात येतंय. अनेकांना त्याचा पदोपदी प्रत्ययही येतो. त्यामुळे 'ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना तोडेंगे' अशीच भावना अनेकांची असते. याच मैत्रीच्या नात्याचा सन्मान करण्यासाठी आज जगभरात 'फ्रेंडशिप डे' अर्थात मैत्री दिन साजरा करण्यात येत आहे.


सर्वच वयोगटातील लोकांना, खासकरुन युवकांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारची जास्त आतुरता असते. कारण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यात येतो. या दिवशी अनेकजण एकमेकांना फ्रेन्डशीप बॅन्ड बांधतात आणि आपली मैत्री अधिक घट्ट करतात. पण या दिवसाची सुरुवात कशी आणि कुठे झाली याची आपल्याला माहिती आहे का? तर मग चला युवकांना प्रिय असलेल्या या 'फ्रेंडशिप डे' ची सुरुवात कशी झाली ते पाहूयात. 


'फ्रेन्डशीप डे' चा इतिहास
आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रेंडशिप डे ची सुरुवात ही 1958 साली झाली असं सांगण्यात येतंय. जॉय हॉल या नावाच्या व्यक्तीचा हॉलमार्क कार्ड्स चा व्यवसाय होता. लोकांनी फ्रेंडशिप डे साजरा करुन आपल्या मैत्रीच्या नात्याला अधिक घट्ट करावं अशी त्याची इच्छा होती. त्यातूनच त्याने फ्रेंडशिप डे साजरा करायला सुरवात केली. 


मैत्री म्हणजे प्रेम, आपुलकी, आनंद, समाधान आणि बरंच काही. मैत्री हे रक्ताच्या नात्याहूनही अधिक घट्ट असते. मैत्रीचे नात्यात जात, धर्म, वंश, वर्ण अशा प्रकारचे अडथळे कधीही येत नाहीत. भारतातील फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिनाचे मूळ हे प्राचीन युगात सापडते. कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचे गुणगाण आजही गायले जाते. 


भारतीय लोकांमध्ये मैत्रीच्या नात्याला एक खास असं स्थान आहे. म्हणूनच मैत्रीच्या नात्यावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटं आणि हिट गाणी तयार झालेली आहेत. 


भारतामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जरी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येत असला तरी जागतिक स्तरावर तो 30 जुलैला साजरा करण्यात येतोय. युनायटेड नेशन्सनी 2011 साली आपल्या 65 व्या सेशनमध्ये 30 जुलै हा फ्रेन्डशीप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. 


अनेकांच्या आयुष्यात मैत्रीचे स्थान हे सर्वोच्च असते. म्हणूनच ते म्हणतात, 'बनें चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहें दोस्ताना हमारा!' आणि खरीखुरी मैत्री निभावतातही. अशा सर्व जिगरी मित्रांसाठी मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


संबंधित बातम्या :