Guwahati-Bikaner Express Derailed: गुवाहाटीवरुन बिकानेरला जाणाऱ्या बिकानेर एक्सप्रेसचा बंगालमधील धामोहनी या ठिकाणी अपघात झाला आहे. या अपघातात रेल्वेचे 12 डबे रुळावरुन घसरले असून त्यामध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्याचं काम वेगाने सुरू आहे.
संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाल्याची माहिती आहे. भारतीय रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, गुवाहाटी-बिकानेर एक्सप्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले आहेत. अचानक झटका बसल्याने हा अपघात झाला असून या ठिकाणी वेगाने बचाव कार्य सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेची तातडीने दखल घेतली असून रेल्वे मंत्र्यांकडून याबाबतची माहिती मागवली आहे. या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. उत्तर-पूर्व रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी गुनीत कौर यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, "या घटनेत ज्या लोकांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमींना एक लाख रुपये मदत देण्याची घोषणा रेल्वे विभागाने केली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक उच्च स्तरीय चौकशी समिती बसवण्यात आली आहे."