गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्यावर पराभवाचं सावट आहे. त्यापासून वाचण्यासाठी काँग्रेसने आमदारांना बंगळुरुमध्ये नेऊन ठेवलं आहे.
भाजपकडून साम-दाम-दंड-भेदचा वापर : काँग्रेस
काँग्रेस नेते शक्ती सिंह गोहिल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपकडून साम-दाम-दंड आणि भेद ही पद्धत अवलंबली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. राजकारणात विरोधकांना कमजोर करण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जातात, मात्र भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेसच्या 22 आमदारांना पैसे देऊन राजीनामा द्यायला लावण्याचा भाजपचा डाव होता. आमदारांना 15-15 कोटी रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं, असा आरोप गोहिल यांनी केला.
दरम्यान राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसकडे आवश्यक मतं आहेत, असा दावाही गोहिल यांनी केला. काँग्रेसचे 57 आमदार आहेत. एनसीपीसोबत काँग्रेसची युती आहे. ज्यांचे दोन आमदार आहेत. तर जेडीयूच्या एका आमदाराचाही काँग्रेसला पाठिंबा असून एकूण 60 आमदारांचा पाठिंबा आहे आणि जिंकण्यासाठी 45 आमदारांची गरज आहे, असा दावा गोहिल यांनी केला.
गुजरातमध्ये पूरपरिस्थितीमुळे जीव जात असलेल्या लोकांची चिंता भाजपला नाही, तर काँग्रेसचे आमदार फोडण्याच्या तयारीत भाजप आहे, असा आरोप गोहिल यांनी केला. काँग्रेसचे आमदार पैशांनी विकणारे नाहीत. त्यामुळे एकत्र राहून विश्वास एकवटता येईल, या उद्देशाने आमदारांनीच बंगळुरुला येण्याचा निर्णय घेतला, असंही गोहिल यांनी सांगितलं. तर आमदारांचे मोबाईल जप्त केल्याचं वृत्त खोटं असल्याचंही ते म्हणाले.
गुजरातमध्ये काँग्रेसवर राजकीय संकट
गुजरातमध्ये काँग्रेसच्या 57 आमदारांपैकी 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर पक्षाचे वरिष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे.
उर्वरित आमदारांपैकी काही आमदार वाघेला गटाचे आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीपूर्वी आमदार फुटू नयेत, यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. 42 आमदारांना भाजपच्या भीतीने बंगळुरुला हलवण्यात आलं असून एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. राज्यसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा पराभव टाळण्यासाठी काँग्रेसला मोठी मेहनत घ्यावी लागत आहे.
काँग्रेसचे आणखी काही आमदार फुटणार?
काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आता केवळ 51 आमदार उरले आहेत. त्यापैकी किती आमदार पक्षासोबत राहतील, याबाबत मोठी शंका आहे. कारण पक्षाला सध्या 44 आमदारांचाच पाठिंबा असल्याचं काँग्रेस नेते भरत सिंह सोलंकी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे आणखी काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देतील, असा अंदाज लावला जात आहे.
संबंधित बातम्या :