अहमदाबाद : गुजरातचे आरोग्यमंत्री कुमार कानाणी यांच्या मुलाला कर्फ्यूत गाडी फिरवताना वाहतूक पोलिसांनी पकडलं होतं. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सुनीता यादव हिने कनानी यांच्या मुलाला चांगलेच खडे बोल सुनावले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या घटनेनंतर सुनीता यादवने पोलीस आयुक्त राजेंद्र ब्रह्मभट्ट यांची भेट घेऊन आपण आपली ड्युटी करत असल्याचं सांगितलं. सुनीता यादवने आता नोकरी सोडून पुन्हा अभ्यास करुन आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पोलीस आयुक्तांनीही सुनीताला यासाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच तिची काही तक्रार असल्यास ती लिखीत स्वरुपात देण्याचंही पोलीस आयुक्तांनी तिला सुचवलं आहे.
कायदा मोडल्याने महिला कॉन्स्टेबलने थेट राज्यमंत्र्यांना जाब विचारला; व्हिडीओ व्हायरल
काय आहे घटना?
शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास कर्फ्यु दरम्यान, राज्यमंत्री कुमार कानाणी यांचे समर्थक मास्क न घातला सूरतच्या वारक्षामध्ये फिरत होते. यादरम्यान, ड्यूटीवर तैनात असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना रोखलं. त्यानंतर प्रकाश कानाणी आपल्या समर्थकांना सोडवण्यासाठी तिकडे पोहोचले. परंतु, महिला कॉन्स्टेबलने त्यांचं ऐकलं नाही आणि वडिलांशी बोलणं करून देण्यास सांगितले.
सुनीता यादवने आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांच्याशी बोलताना त्यांना प्रश्न विचारला की, जेव्हा संपूर्ण शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे, तर तुमचे समर्थक मास्क न लावता घराबाहेर कसे पडले? नियम-कायदे सर्वांसाठी वेगवेगळे आहेत का? तसेच, पुढे बोलताना महिला कॉन्स्टेबल म्हणाली की, तुम्ही गाडीत नसून देखील तुमच्या नावाची प्लेट गाडीवर का लावण्यात आली आहे?
संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, महिला कॉन्स्टेबल आपलं कर्तव्य पार पाडत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्यमंत्र्यांचा आरोप आहे की, महिला कॉन्स्टेबल त्यांचा मुलगा प्रकाश कानाणी यांचा अपमान केला. त्यानंतर पोलीसांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. असं सांगण्यात येत आहे की, यंत्रणेच्या भोंगळ कारभाराला कंटाळून सुनीता यादव यांनी राजीनामा दिला आहे.