नवी दिल्ली : राजस्थानच्या राजकारणातली सर्वात महत्वाची घडामोड आज घडलीय. 19 आमदारांना घेऊन गेल्या दोन दिवसांपासून नाराजीचं प्रदर्शन करणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसनं अखेर कारवाई केलीय. त्यामुळे राजस्थानचं राजकारण आता कुठल्या वळणावर पोहचतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
राजस्थानच्या राजकारणात अखेर पायलटचं क्रॉस लँडिंग झालं आहे. सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजस्थानी नाट्यात अखेर काँग्रेसनं कारवाईचं मोठं पाऊल उचललं. 19 आमदारांना सोबत घेऊन सरकार पाडण्याचं षडयंत्र केल्याच्या आरोपावरुन सचिन पायलट यांची सर्व महत्वाची पदं काढून घेण्यात आली आहेत.
या कारवाईनंतर सगळ्यात महत्वाचे दोन प्रश्न निर्माण होतात. राजस्थान सरकार अजूनही सुरक्षित आहे का आणि दुसरं म्हणजे सचिन पायलट आता पुढचं पाऊल काय उचलणार आहे. सचिन पायलट यांच्या बंडानंतरही राजस्थान सरकारला तूर्तास धोका नाही. कारण या 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली की संख्याबळ 180 च्या आसपास येतं. बहुमताचा आकडा होतो 91 आणि गहलोतांकडे तूर्तास तरी 100 च्या पुढे आमदार आहेत. प्रश्न असा आहे की सचिन पायलट जर भाजपमधे जाणार नाहीयत, तर मग ते नवा पक्ष काढणार का?
गेल्या दोन दिवसांपासून सचिन पायलट यांनी या सगळ्या प्रकरणावर चुप्पी साधली होती. आज ही कारवाई झाल्यानंतर मात्र एका ओळीचं ट्वीट केलं. गेल्या तीन महिन्यांत काँग्रेसला बसलेला हा दुसरा धक्का आहे. ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये गेले. मध्य प्रदेशातलं काँग्रेसचं सरकारही गेलं आणि आता सचिन पायलट. पण मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या आकड्यांमध्ये फरक आहे. त्यामुळेच तूर्तास इथे काँग्रेसला सरकार जाण्याचा धोका नाही.
काँग्रेसच्या इतिहासातला हा अत्यंत महत्वाचा आणि कसोटीचा क्षण. ममता बॅनर्जी, शरद पवार, जगनमोहन रेड्डी इतकंच काय पी चिदंबरम, प्रणव मुखर्जी यांनीही कधीकाळी काँग्रेसची साथ सोडलेली होती. आता सचिन पायलटही त्याच रांगेत उभे आहेत. फक्त यात ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी यांच्यासारख्यांनी पूर्ण राज्य काबीज केलं, पवारांना पुन्हा काँग्रेसशी जुळवून घ्यावं लागलं. तर चिदबंरम, मुखर्जी यांच्यासारखे थेट पुन्हा पक्षात परतले. आता सचिन पायलट यांच्यापैकी कुणाच्या मार्गावर जाणार हे येणाऱ्या काळात कळेल.
दरम्यान या घडामोडीनंतर आता राजस्थानमधलं सरकार अल्पमतात असल्याचा आरोप भाजपनं केलाय. त्यामुळे सरकारवर पुन्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ येणार का हे देखील पाहावं लागेल. सचिन पायलट हे सध्या 42 वर्षांचे आहेत. 36 व्या वर्षी काँग्रेसनं त्यांना प्रदेशाध्यक्ष नेमलं होतं. 40 व्या वर्षी ते उपमुख्यमंत्री बनले. आता त्यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचं सांगत बंडाचं निशाण फडकवलंय. हे बंड गहलोतांच्या समोर काय आव्हान निर्माण करतं आणि भविष्यात राजस्थानात काँग्रेसची स्थिती काय करुन ठेवतं हे पाहणं महत्वाचं असेल.
Rajasthan Politics ज्योतिरादित्यंनंतर सचिन पायलटही भाजपच्या वाटेवर? सचिन पायलटांची नाराजी दूर होणार?