Ahmedabad plane crash: गुजरातच्या अहमदाबाद एअरपोर्टवरुन उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या विमानाने दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण केले होते. यानंतर 1 वाजून 38 मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल नियंत्रण कक्षाला मिळाला. यानंतर हे विमान मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात कोसळले. विमान कोसळल्यामुळे मेघानी नगरमध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. हा भाग दाट लोकवस्तीचा होता. त्यामुळे विमानातील प्रवाशांसोबत मेघानी नगरमधील नागरिकांचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे विमान खाली कोसळण्यापूर्वी हवेत तब्बल 625 फुटांवरुन उड्डाण करत होते. त्यानंतर विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा. या विमानाचे वैमानिक सुमीत सभरवाल यांनी हवाई नियंत्रण कक्षाला आपातकालीन कॉल केला होता. मात्र, मदत करण्यापूर्वीच हे विमान मेघानी नगरमध्ये कोसळले. मेघानी नगरमध्ये अनेक इमारती आहेत. त्यापैकी एका रुग्णालयाच्या इमारतीवर हे विमान कोसळले. यामध्ये रुग्णालयाचा टीबी विभाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तसेच रुग्णालयातील 15 डॉक्टर आणि काही रुग्ण जखमी झाले आहेत. सध्या मेघानी नगरचा संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे. याठिकाणी केवळ अग्निशामन दल, एनडीआरएफ आणि बचावकार्य करणाऱ्या पथकांना प्रवेश आहे. विमान पडलेल्या भागातून इमारतींमध्ये असलेल्या नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला होता. या हादऱ्यांनी मेघानी नगरमधील इमारतींना तडे गेले आहेत.

अहमदाबादवरुन लंडनला जाणाऱ्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटीश आणि कॅनडाच्या एका नागरिकाचा समावेश आहे. या विमानाने नुकतेच उड्डाण केल्यामुळे विमानाची इंधन टाकी पूर्णपणे भरली होती. या टाकीमध्ये जवळपास सव्वा लाख लीटर इंधन होते. त्यामुळे विमान कोसळताच प्रचंड मोठा स्फोट झाला. 

आणखी वाचा

MAYDAY... MAYDAY... MAYDAY, प्लेन क्रॅशपूर्वी पायलटनं पाठवलेला सिग्नल, पण...

'ती' बातमी अखेर खरी ठरली, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात, बोर्डिंग पास मिळाला!

अहमदाबाद एअरपोर्टवरुन एअर इंडियाचं बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर पसरला, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या

अहमदाबाद विमान अपघात, विमान कसं कोसळलं, पहिला व्हिडीओ समोर