Ahmedabad plane crash: गुजरातची राजधानी असलेल्या अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे प्रवाशी विमान कोसळून भीषण अपघात झाला. या अपघाताच्या वेळी विमानामध्ये तब्बल 242 प्रवासी होते. त्यामुळे या दुर्घटनेत खूप मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर (Meghani Nagar) या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळले (plane crash). त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या घटनास्थळी प्रचंड काळा धूर असल्यामुळे काहीच दिसत नाही. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्याला सुरुवात झाली आहे. अहमदाबादवरुन लंडनला जाणाऱ्या या विमानाने नुकतेच उड्डाण केले होते. त्यामुळे विमानाच्या इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरलेल्या होत्या. त्यामुळे विमान कोसळल्यानंतर आगीचा मोठा भडका उडून मोठ्याप्रमाणावर जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. उड्डाण केल्यानंतर विमान लगेच कोसळले. विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एअर इंडियाच्या या विमानाने दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी लंडनला जाण्यासाठी हवेत उड्डाण केले. त्यानंतर 1 वाजून 38 मिनिटांनी विमानाचा अखेरचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर विमानचा अपघात झाला. एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर हे विमान अत्यंत उत्कृष्ट विमानांपैकी एक आहे. जगातील अनेक प्रमुख विमान कंपन्या या विमानाचा वापर करतात. या विमानाची प्रवाशी क्षमता 300 इतकी आहे. अपघाताच्यावेळी विमानात 242 प्रवासी होते, असे सांगितले जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.
हा अपघात इतका भीषण होता की, या विमानाचे तुकडे झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी पोहोचले तेव्हा मेघानी नगरमध्ये विमानाचे भाग विखुरले होते. एअर इंडियाच्या विमानाची चाकं आणि इतर भाग पूर्णपणे वेगळे झाले होते. या अपघाताची भीषणता पाहता यामध्ये विमानातील 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयकुमार रुपाणीही या विमानातून प्रवास करत होते, अशी माहिती आहे. मात्र, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या दुर्घटनेमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अपघातामुळे सध्या मेघानी नगर परिसरातही मोठे नुकसान झाले आहे. अनेक वाहने जळाली असून इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
आणखी वाचा