Gujarat Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातमधील (Gujarat News) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाच्या विमानानं टेक ऑफ करताच ते क्रॅश झालं. दुर्घटनेवेळी विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीदेखील प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement


दरम्यान, विमान अपघाताबाबत  माहिती समोर आली आहे, त्यातील सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे, अपघातापूर्वी विमानाच्या पायलटनं जवळच्या एटीसीला एक सिग्नल पाठवला होता, जो धोक्याचे संकेत देत होता आणि त्यानंतर काही क्षणांतच विमान कोसळलं. 


विमान अपघातानंतर डीजीसीएनं सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार, 12 जून 2025 रोजी अहमदाबादहून गॅटविकला जाणारं एअर इंडियाचं बी787 विमान (एआय-171) टेकऑफनंतर लगेचच कोसळलं. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल चालवत होते, तर त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते. सुमित सभरवालला 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर क्लाईव्हला 1100 उड्डाण तासांचा अनुभव होता.


सर्वात महत्वाची बाब म्हणजे, या विमानानं अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी 23 वरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केलं. उड्डाण घेताच, जवळच्या एटीसीला मेडे कॉल पायलटकडून दिला गेलेला, पण त्यानंतर विमानानं एटीसीला कोणताही सिग्नल दिला नाही. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान क्रॅश झालं. 


MAYDAY Call म्हणजे काय?


कोणत्याही विमानात, 'मेडे कॉल' हा एक आपत्कालीन संदेश असतो, जो विमान गंभीर संकटात असताना आणि प्रवाशांच्या किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना पायलट देतो. जसं की, विमानाचं इंजिन निकामी होणं, विमानाला आग लागणं, विमानाची हवेत कोणत्याही गोष्टीशी टक्कर होण्याचा धोका किंवा हायजॅकसारखी परिस्थिती. या कॉलद्वारे, कोणताही पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) आणि जवळच्या विमानांना विमानाला तात्काळ मदतीची आवश्यकता असल्याचं सूचित करतो. 


विमानाच्या रेडिओवर तीन वेळा "MAYDAY, MAYDAY, MAYDAY" असं म्हटलं जातं, जेणेकरून हे स्पष्ट होईल की, हा कोणताही विनोद नाही तर, एक वास्तविक संकट आहे. माहितीनुसार, MAYDAY कॉल देताच, नियंत्रण कक्ष त्या विमानाला प्राधान्य देतो आणि त्याला मदत करण्यासाठी सर्व संसाधने वापरतो, जसं की, आपत्कालीन लँडिंगची परवानगी, विमानाच्या एमर्जंन्सीसाठी धावपट्टी रिकामी करणं, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तयार ठेवणं. 'MAYDAY' हा शब्द फ्रेंच शब्द "माएडर" पासून आला आहे, ज्याचा अर्थ मला मदत करा. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की जर परिस्थिती खूप गंभीर नसेल पण चिंतेचा विषय असेल, तर पायलट पॅन-पॅन कॉल करतो, जो 'मेडे' पेक्षा कमी गंभीर मानला जातो.


पाहा व्हिडीओ : गुजरात विमान अपघाताचे अपडेट्स