सुरत (गुजरात) : बलात्कार प्रकरणात आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला सूरत सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.  नारायण साईच्या शिक्षेची सुनावणी 30 एप्रिल रोजी होणार आहे. सुरतच्या जहांगीरपुरा आश्रमातील साधिकेने नारायण साईवर बलात्काराचे आरोप केले होते, ज्यात न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं आहे. पोलिसांनी साधिकेचा जबाब आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर नारायण साईविरोधात गुन्हा दाखल केला होता.

पाच वर्षांनी कोर्टाने आपला निर्णय सुनावला आहे. 2002 मधील आरोपांनुसार, नारायण साईने सुरतमधील जहांगीरपुरा आश्रमातील साधिकेवर बलात्कार केला होता आणि त्यानंतर  2004 पर्यंत सातत्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. यानंतर 6 ऑक्टोबर 2013 रोजी पीडितेने नारायण साई, गंगा, जमुना, हनुमान आणि इतर सात जणांवर सुरतमध्ये गुन्हा दाखल केला होता.

VIDEO | जहांगीरपूरा आश्रम बलात्कार प्रकरणी नारायण साई दोषी, 30 एप्रिलला शिक्षेची सुनावणी | एबीपी माझा



नारायण साईवर बलात्काराचा गुन्हा दाखल होता, तो भूमिगत झाला. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो सातत्याने आपलं ठिकाण बदलत होता. सुरतचे तत्कालीन पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी नारायण साई यांना अटक करण्यासाठी 58 विविध पथकं बनवून शोध सुरु केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यानंतर 4 डिसेंबर, 2013 मध्ये नारायण साईला हरियाणा-दिल्ली सीमाजवळ अटक करण्यात आली.

साधिकेने आपल्या जबाबात नारायण साईविरोधात सबळ पुरावे दिले होते. नारायण साईविरोधात कोर्टाने आतापर्यंत 53 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी काहींनी या दोन्ही बहिणींवर अत्याचार करताना पाहिल्याचं म्हटलं आहे. तर ज्यांनी या कृत्यात आरोपींची मदत केली होती, ते आता साक्षीदार बनले आहेत.

त्यावेळी नारायण साईने शीख व्यक्तीचं वेशांतर केलं होतं. स्वत:ला कृष्णाचा अवतार असल्याचं सांगणाऱ्या नारायण साईच्या अटकेनंतर, कृष्णाप्रमाणे महिलांमध्ये बासरी वाजवण्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते.

जेलमध्ये असताना पोलिस कर्मचाऱ्याला 13 कोटी रुपयांची लाच देण्याचा आरोपही नारायण साईवर लागला होता, पण या प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे.