नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. प्रियांका गांधीदेखील त्यासाठी अनुकूल होत्या. तरिदेखील वाराणसी मतदार संघातून काँग्रेसने प्रियांका गांधीऐवजी अजय राय यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामागे अनेक कारणे आहेत. "काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व हे निवडणूक हरण्यासाठी नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे असल्यामुळे प्रियांका यांना वाराणसीतून उमेदवारी दिली नाही.


काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा प्रचार करत असताना पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीवेळी म्हणाल्या की, मी वाराणसीतून निवडणूक लढले तर चालेल का? त्या दिवसापासून वाराणसीत प्रियांका गांधी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी लढत होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या.

याबाबत काँग्रेस हायकमांडने कांग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांशी बातचित केली. त्यावेळी अनेकांचे असे मत होते की, काँग्रेसचे प्रमुख नेतृत्व हे निवडणूक हरण्यासाठी लढू शकत नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपतींना फोन करुन याबाबत विचारले, त्यावर समोरुन उत्तर आले की, 'Gandhi's cannot fight elections to loose'. (गांधींनी हरण्यासाठी निवडणूक लढू शकत नाही)

प्रियांका गांधी या पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी आहेत. त्यामुळे प्रियांका गांधी पूर्व उत्तर प्रदेशसह संपूर्ण युपीमध्ये काँग्रेसचा प्रचार करत आहेत. जर प्रियांका गांधी यांना वाराणसीतून उमेदवारी दिली तर त्यांचे काम वाराणसीपुरते मर्यादीत राहील, त्यांना इतर मतदार संघांमध्ये काँग्रेसचा प्रचार करता येणार नाही, त्यामुळे प्रियांका गांधी यांना वाराणसीतून उमेदवारी दिली नाही.

व्हिडीओ पाहा



मागील आठवड्यात काँग्रेसच्या वायनाड मतदार संघातील प्रचाराच्या रॅलीदरम्यान प्रियांका म्हणाल्या होत्या की, "काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मला वाराणसीतून निवडणूक लढ असे म्हणाले तर मला खूप आनंद होईल. त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे." परंतु आज काँग्रेसने वाराणसीतन अजय राय यांना उमेदवारी देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.