वाराणसी : वाराणसीचं रण पुन्हा एकदा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (26 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करताना जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाश सिंह बादल यांच्यासह एनडीए घटपक्षातीस दिग्गज नेते उपस्थित होते.

पंतप्रधानांनी गुरुवारी रोड शो करुन आपली ताकद दाखवली होती. आजही मोदींच्या उमेदवारीला एकजूटपणा दाखवण्यासाठी एनडीएचे सर्व नेते सहभागी झाले होते. यावेळी मोदींनी एनडीए घटकपक्षातील सर्वात ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

वाराणसीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी देशातल्या नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं.

नरेंद्र मोदी वाराणसीतून दुसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. 2014 मध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळाली होती. मोदींचा तोच करिष्मा आता 2019 लाही चालणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.



सर्व समाजाचे प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी (25 एप्रिल) आयोजित ऐतिहासिक रोड शोनंतर पंतप्रधानांनी काशीमध्ये सभेला संबोधित करुन जनतेकडून उमेदवारी अर्ज करण्याबाबत परवानगी मागितली होती. मागच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना चार सूचक विशेषत: त्यांच्यासोबत उपस्थित होते.

यंदा पंतप्रधान मोदींच्या उमेदवारी अर्जासाठी ज्या सूचकांची नावं आहेत, त्यात चौकीदारापासून राजा डोमच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश आहे. यंदा राजा डोमच्या कुटुंबातील जगदीश चौधरी हे पंतप्रधान मोदींचे सूचक बनले. तर पटेल धर्मशाळेचे रामशंकर पटेल हे देखील मोदींचे सूचक होते.

नरेंद्र मोदींच्या इतर दोन सूचकांमध्ये पाणिनी कन्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अन्नपूर्णा शुक्ला आणि चौकीदारांमधील एकाचा समावेश होता. सूचकांद्वारे पंतप्रधान मोदींना सर्व समाजाचं प्रतिनिधित्व दाखवायचं होतं. त्यामुळे राजा डोम कुटुंबासह अन्नपूर्णा शुक्ला यांना मोदींचे सूचक बनवलं. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी अन्नपूर्णा शुक्ला यांचे आशीर्वादही घेतले.

2014 मधील सूचक
पंतप्रधान मोदी 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढले होते, त्यावेळी त्यांच्या प्रस्तावकांची विशेष निवड करण्यात आली होती. मागील वर्षी गिरीधर मालवीय, शास्त्रीय गायक छन्नू लाल मिश्र, मल्ल समाजातून भद्रा प्रसाद निषाद आणि बुनकर समाजातून अशोक कुमार हे मोदींचे प्रस्तावक होते. 2014 मध्ये शहरातील  प्रसिद्ध चहावाला पप्पूही नरेंद्र मोदींचा प्रस्तावक बनला होता. मागील वर्षी मोदींनी 24 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.