BSF Soldier Lynched : गुजरातमध्ये (Gujarat) सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला (BSF Soldier) आधी बेदम मारहाण, नंतर मृत्यू, या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेनंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. आपल्या मुलीचा अश्‍लील व्हिडीओ शेअर केल्याच्या निषेधार्थ शनिवारी गुजरातमधील नडियाद येथे एका बीएसएफ जवानाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह सात जणांना अटक केली आहे. व्हिडीओ शेअर करणारा आरोपी मुलगा फरार आहे. या भीषण हल्ल्याची घटना जवानाच्या मुलाने आणि पत्नीने कथन केली आहे. काय म्हणाले ते?



"तेव्हा मागून काही लोक आले...", जवानाच्या मुलाने सांगितली आपबिती


बीएसएफ जवान मेलजीभाई वाघेला यांचा मुलगा प्रतीक याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ही घटना 24 डिसेंबरची आहे. जेव्हा माझे आई-वडील आणि भाऊ व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपींशी बोलायला गेले तेव्हा मागून काही लोक आले आणि त्यांनी माझ्या वडिलांच्या डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. माझ्या भावाच्या डोक्याला दुखापत झाली आणि माझ्या आईलाही मारहाण झाली. 


 


माझ्या पतीला आणि मला काठीने मारहाण, जवानाच्या पत्नीने सांगितला घडलेला प्रकार 


मृत बीएसएफ जवानाच्या पत्नीने सांगितले की, शैलेश नावाच्या तरुणाने आमच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल केला आणि तेथून पळून गेला. आम्ही 3 दिवस त्याच्या शोधात गेलो. तिसर्‍या दिवशी आम्ही त्याचा शोध घेण्यासाठी ज्या ठिकाणी गेलो, तिथे 7 जण बसले होते. माझ्या पतीने आरोपीबाबत विचारणा केली, मात्र शैलेश तेथे नव्हता. आम्ही परतत असताना काही लोकांनी माझ्या पतीला काठीने मारहाण केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली, यानंतर माझ्या हात-पायांना दुखापत झाली आहे



जवानावर धारदार शस्त्रांनी हल्ला, पोलिसांची माहिती


या प्रकरणी नडियादचे पोलीस अधिकारी व्ही आर बाजपेयी म्हणाले की, त्यांच्या मुलीचे अश्लील व्हिडीओ प्रसारित करण्यास विरोध केल्यामुळे एका बीएसएफ जवानाची हत्या करण्यात आली, ज्यामध्ये 7 जणांना अटक करण्यात आली आहे. चकलासी येथील एका गावात, मृत जवान त्यांच्या कुटुंबासह 24 डिसेंबरच्या रात्री 15 वर्षीय आरोपी मुलाच्या घरी गेले होता, ज्याने व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केला होता. ही चर्चा सुरू असतानाच पलीकडून जवानावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला.


 


BSF जवानाचा जागीच मृत्यू, सात जणांना अटक


पोलिसांच्या माहितीनुसार, गंभीर जखमी झाल्याने BSF जवानाचा जागीच मृत्यू झाला. 302, 307, 323, 504, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल करून दोन महिलांसह सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही पूर्वनियोजित हत्या नाही. मृताच्या मुलाने आरोपी शैलेश विरोधात तक्रार दिली असून, त्यावरून पोलीस तपास करणार आहेत. पोलीस शैलेशचा शोध घेत आहेत. शैलेशविरुद्ध पोक्सो आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संबंधित बातम्या


BSF Soldier Lynching : क्रूरतेचा कळस, भारत मातेचे रक्षण करणाऱ्या BSF जवानाच्या मुलीचाच बनवला अश्लील व्हिडीओ, विरोध केल्याने जवानाची हत्या