Russian MP Pavel Antov Death Case: रशियन (Russia) खासदार पॉव्हेल अॅटोव्ह हे भारतातील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ते ओडिशाच्या रायगडा भागात एका हॉटेलमध्ये आपला 65 वा वाढदिवस साजरा करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या तिसर्‍या मजल्यावरील खिडकीतून पडून त्यांचा मृत्यू झाला. 


रशियाची (Russia)  न्यूज एजन्सी TASS ने दिलेल्या वृत्तानुसार, ओडिशातील एकाच हॉटेलमध्ये एका आठवड्यात रशियाच्या दोन खासदारांचा मृत्यू झाला आहे. अॅटोव्ह यांच्या मृत्यूची चौकशी करणारे पोलीस अधीक्षक विवेकानंद शर्मा म्हणाले की, अधिकाऱ्यांनी 26 डिसेंबर रोजी त्यांच्या कुटुंबाच्या परवानगीने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. अॅटोव्ह हे रविवारी 24 डिसेंबर रोजी मृतावस्थेत आढळेल होते. हे दोन्ही खासदार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक होते. काही दिवसांपूर्वीच या दोन्ही खासदारांनी युक्रेनवरील रशियन हल्लावरून पुतिन यांच्यावर टीका केली होती.  


पॉव्हेल यांचा मृत्यू त्यांच्या पक्षातील खासदार व्लादिमीर बुडानोव्हच्या संशयित मृत्यूनंतर दोन दिवसांनी झाला. तेही याच हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले होते. व्लादिमीर आणि पॉव्हेल यांच्यासह चार रशियन (Russia) पर्यटकांनी 21 डिसेंबर रोजी कंधमाल जिल्ह्यातील दरिंगबाडीचा दौरा केल्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन केले होते. पोलिसांनी सांगितले की, अॅटोव्ह शनिवारी (24 डिसेंबर) हॉटेलच्या बाहेर रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडले. पोलिसांनी सांगितलं आहे की, व्लादिमीर यांच्या मृत्यूने ते दुखी होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.   


भारतातील (India) रशियन (Russia) दूतावासाने एनडीटीव्हीला सांगितले की, "आम्हाला ओडिशातील दुःखद घटनेची माहिती आहे. येथे आमच्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियन दूतावासाने पुढे सांगितले की, "आम्ही मृतांच्या नातेवाईकांशी तसेच स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहोत. दरम्यान, व्लादिमीर बुडानोव्ह आणि पॉव्हेल अॅटोव्ह हे रशियन (Russia) पर्यटकांच्या चार सदस्यीय गटाचा भाग होते. त्यांनी बुधवारी (21 डिसेंबर) रायगडा शहरातील हॉटेलमध्ये चेक इन केले होते. अॅटोव्ह याच्या मृत्यूबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. पीटीआय या वृत्तसंस्थेने पोलीस कार्यालयाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'मित्राच्या मृत्यूमुळे अॅटोव्ह डिप्रेशनमध्ये होते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.