गांधीनगर : सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पाटीदार नेता हार्दिक पटेलने स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असला, तरी एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पटेलचे 10 सहकारी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.


गुजरातमध्ये तब्बल दोन दशकापासून काँग्रेस सत्तेतून दूर राहिली आहे. त्यामुळे यंदा सत्ता खेचून आणण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच पाटीदार नेता हार्दिक पटेलला आपल्या गोटात ओढण्यासाठी काँग्रेसमध्ये खलबतं सुरु आहेत.

सध्या हार्दिक पटेलकडून काँग्रेसला समर्थन मिळाल्याचं पक्क मानलं जात असलं, तरी स्वत: हार्दिक पटेल निवडणूक लढवणार का? याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. कारण, त्याने वयोमर्यादेचं कारण देत, निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचं आधीच जाहीर केलं आहे.

दरम्यान, हार्दिक पटेलचे निकटवर्तीय आणि पाटीदार आरक्षण समितीच्या पहिल्या फळीतील 10 नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं समजतं आहे. हे सर्वजण हार्दिक आणि पाटीदार समाजाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर सौराष्ट्रमधून निवडणूक लढणार आहेत. विशेष म्हणजे, हे सर्वजण काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरणाऱ्यांची नावे

  1. दिलीप साबवा : दिलीप साबवाने सौराष्ट्रमध्ये अमानत आंदोलनाचं नेतृत्व केलं आहे. व्यवसायाने शिक्षक असलेल्या दिलीपने, पाटीदार आंदोलनादरम्यान नोकरीचा राजीनामा देऊन आरक्षणाच्या लढ्यात उडी घेतली. काँग्रेसकडून त्याला तिकीट मिळाल्यास, तो बोटादमधून निवडणूक लढणार आहे.

  2. ललित वसोया : ललित वसोया हे नाव गुजरातमधील राजकारणात तसं नवं नाही. लिलत सौराष्ट्रमध्ये पाटीदार आंदोलन समितीचा संयोजक आहे. त्याशिवाय, तो राजकोट जिल्ह्यातील भाजपचा उपाध्यक्ष देखील राहिलेला आहे.

  3. गीता पटेल : गीता पटेल ही अनामत आंदोलनातील एकमेव महिला संयोजक आहे. हार्दिक पटेलच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी गीता एक असल्याचं सांगितलं जातं. काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यास ती अहमदाबादमधील बटवामधून निवडणूक लढवू शकते.

  4. मनोज पनारा : मनोज पनारा सौराष्ट्रमधील मोरबीचा संयोजक आहे. सुरतमधील अमित शाहांच्या सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. यानंतर तो सर्वाधिक चर्चेत राहिला होता. काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यास तो मोरबीमधून निवडणूक लढवू शकतो.


गुजरातमधील जातीय समीकरणं, आणि काँग्रेसची रणनिती

गुजरातमध्ये पटेल समाजाची संख्या 15 टक्के आहे. तर राज्यातील 80 टक्के जागावर पटेल समाजाचा सर्वाधिक प्रभाव आहे. वास्तविक, पटेल समाज हा भाजपची व्होटबँक मानली जाते. भाजपच्या 182 आमदारांपैकी 44 आमदार हे पटेल समाजाचे आहेत. पण सद्यस्थितीत पाटीदार समाज भाजपवर कमालीचा नाराज आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने पाटीदार समाजाला आपल्याकडे वळवले, तर काँग्रेसला या निवडणुकीत सहज विजय मिळवता येईल, असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे.

पाटीदार समाज भाजपवर का नाराज आहे?

गुजरातमध्ये पटेल समाजात कडवा, लेवा आणि आंजना असे तीन प्रकारचे गट आहेत. आंजना पटेल ओबीसी प्रवर्गात येतात. तर कडवा आणि लेवा पटेल ओबीसी आरक्षणाची मागणी करत आहेत. या दोन गटाला आरक्षण मिळत नसल्याने, या दोन्ही गटातील पटेल भाजपवर नाराज आहेत.

संबंधित बातम्या

ABP चा ओपनियन पोल : गुजरातमध्ये मोदी की राहुल गांधी?

शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवणार

मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना नमन करणं हा सर्वोच्च क्षण: हार्दिक पटेल

गुजरात निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलला दणका, 'पाटीदार ऑर्गनायझेशन'मध्ये फूट