ब्रेक घेत गँगरेप नाही, सहमतीने दोघांशी सेक्स, डॉक्टरचा अहवाल
एबीपी माझा वेब टीम | 10 Nov 2017 06:37 PM (IST)
तक्रार दाखल झाल्यानंतर केलेल्या पहिल्या वैद्यकीय अहवालात तिने संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचं म्हटलं होतं.
भोपाळ : गेल्या आठवड्यात भोपाळमध्ये युवतीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने अवघा देश हादरला होता. मात्र पीडितेवर गँगरेप झाला नसून दोन आरोपींशी तिने सहमतीने सेक्स केलं, असा धक्कादायक वैद्यकीय अहवाल देण्यात आला. त्यानंतर, हा अहवाल एका ज्युनिअर डॉक्टरची चूक असल्याचं सांगत सारवासारव करण्यात आली आहे. ज्युनिअर डॉक्टरच्या नावावर बिल फाडत भोपाळमधील सरकारी रुग्णालयाने हात झटकले आहेत. संबंधित अहवालातील चूक तात्काळ सुधारण्यात आली, असंही सुलतानिया रुग्णालयाचे अधीक्षक करण पीपरे यांनी सांगितलं. 31 ऑक्टोबर रोजी चार नराधमांनी 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे चहा, गुटखा, सिगरेटसाठी ब्रेक घेऊन आरोपींनी पीडितेवर तीन तास अत्याचार केला. महत्त्वाचं म्हणजे पीडित तरुणीचे वडील पोलीस उपनिरीक्षक (PSI) तर आई गुन्हे अन्वेषण विभागात (CID) कार्यरत आहे. आयपीएसचा अभ्यास करणारी पीडित विद्यार्थीनी कोचिंग क्लासवरुन परत येत होती. त्यावेळी चार नराधमांनी हबीबगंज रेल्वे स्टेशनजवळून तिचं अपहरण केलं. तिला ट्रॅकजवळ निर्जन स्थळी नेऊन एका ब्रिजखाली तिच्यावर अत्याचार करण्यात आले.