नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यामध्ये केंद्र सरकार एकीकडे 28 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करण्याचा विचार करत आहे. तर दुसरीकडे 12 आणि 18 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करुन याचा एकच 14 टक्क्यांचा स्लॅब करण्याचा विचार करत आहे. शनिवारच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो.


जीएसटीच्या फिटमेंट कमिटीचे प्रमुख आणि बिहारचे अर्थमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या मते, आता जीएसटीमध्ये 12 आणि 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबला एकत्र करण्यावर काम सुरु आहे. याबाबतीत राज्यांसोबत चर्चाही केली जात आहे. 12 आणि 18 टक्क्यांचा एकच 14 टक्के असा स्लॅब बनवला जाऊ शकतो.

28 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करण्याची तयारी

अर्थ मंत्रालयातील सूत्रांच्या मते, आता हळूहळू जीएसटीतील 28 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द केला जाणार आहे. सध्या यामध्ये 37 वस्तू आहेत. सिमेंट यामधून बाहेर काढण्यावर सर्वांचं एकमत झाल्याची माहिती आहे. हा टॅक्स स्लॅब रद्द केल्यास त्याचा महसुलावर काय परिणाम होईल, ते पाहिलं जाईल आणि मग निर्णय होईल.

छोट्या उद्योगांसाठी खुशखबर?

शनिवारी जीएसटी कौन्सिलची होणारी बैठक ही पूर्णपणे छोट्या उद्योगांवर केंद्रित असेल. या बैठकीत सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी बूस्टर पॅकेज दिलं जाऊ शकतं. सोबतच डिजिटल व्यवहारांमध्ये कॅशबॅक ट्रान्झॅक्शन आणि ई-पेमेंटवरही एकमत होण्याची शक्यता आहे.

जीएसटीनंतर छोट्या उद्योगांच्या अडचणी वाढल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या सर्व तक्रारींचं या बैठकीत निवारण होण्याची शक्यता आहे. लघु उद्योगांना यामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे.