मुंबई : देशभरातल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलध्ये अचानकपणे सेव्ह झालेला ‘UIDAI’चा टोल फ्री क्रमांक ही गुगलची चूक असल्याचं समोर आलं आहे. गुगलने याबाबत स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. त्यामुळे ‘UIDAI’चा नंबर सेव्ह होणं हा सायबर हल्ला नाही तर गुगलची चूक आहे, हे आता स्पष्ट झालं आहे.
देशभरातल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये काल (3 ऑगस्ट) आधारचा नंबर सेव्ह झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला. त्यानंतर ‘UIDAI’ने आपण याबाबत कोणतेही आदेश दिले नसल्याचं स्पष्ट केलं. पण आता गुगलने आमच्याच चुकीमुळे हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह झाल्याचं मान्य केलं आहे.
गुगलने काय म्हटलं आहे?
‘यूआयडीएआय आणि इतर 112 हेल्पलाईन नंबर अॅन्ड्रॉईडच्या सेटअपमध्ये 2014 साली कोड करण्यात आले होते, अशी माहिती आमच्या इंटरनल सर्व्हेत समोर आली आहे. हा नंबर एकदा ग्राहकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आला की डिव्हाईस बदलल्यानंतरही हा नंबर पुन्हा नव्या डिव्हाईसमध्ये सेव्ह होतो. लोकांना यामुळे त्रास झाला याबाबत आम्हाला खेद आहे,’ असं म्हणत या सर्व प्रकरणावर गुगलने माफीनामा सादर केला.
‘तुमचा मोबाईल हॅक झाला नाही. ‘UIDAI’चा सेव्ह झालेला नंबर तुम्ही डिलीट करु शकता. आम्ही नवीन अॅन्ड्रॉईड सेटअपमध्ये हा नंबर येऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहोत,’ असं गुगलने म्हटलं आहे.
यूआयडीएआयचे स्पष्टीकरण
"अनेकांच्या मोबाईलमध्ये 1800 300 1947 हा नंबर UIDAI नावाने विनापरवानगी सेव्ह झाला आहे. हा नंबर आधारचा नंबर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा नंबर UIDAIचा टोल फ्री नंबर नाही. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. आधारचा हेल्पलाईन नंबर '1947' असून तो अद्यापही सुरू आहे. तसंच हा नंबर लोकांच्या फोनमध्ये सेव्ह करण्याचे कोणतेही आदेश आम्ही टेलिकॉम कंपन्यांना दिलेले नाहीत," असं स्पष्टीकरण ‘UIDAI’ने दिलं होतं.