नवी दिल्ली : काँग्रेस पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत लोकसभा निवडणुकांनंतर निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती शक्य नसल्याचंही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटल्याची माहिती आहे.


निवडणुकीमध्ये पहिलं उद्दिष्ट भाजप-संघाच्या विचारधारेला हरवणं आहे. पंतप्रधानपदाचा विचार नंतर होईल, असं राहुल गांधींचं मत आहे.

शिवसेना आणि काँग्रेस अजिबातच समविचारी नाही. त्यामुळे सेनेसोबत काँग्रेसची युती शक्य नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विरोधीपक्षांची मोट बांधून मोदींचा पराभव करण्याकडे काँग्रेसचा कल आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस आघाडी करणार आहे.

भाजप 230 जागा जिंकलं तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, भाजपमधून दुसरं कोणीतरी पंतप्रधान होईल, असं राहुल गांधींना वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपच्या जवळपास 100 जागा कमी होतील. कारण या ठिकाणी आम्ही युती करत आहोत, असं काँग्रेस म्हणतं. यूपीमध्ये समाजवादी पक्ष, बसप आणि इतर विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न आहेत.

मतदान यंत्रांमध्ये जेव्हा गडबड होते, तेव्हा त्याचा फायदा फक्त भाजपलाच होतो इतर पक्षांना कधीच होत नाही, अशीही शंका काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आली.