GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
GST Council Key Decisions : नवी दिल्लीत पार पडलेल्या 57 व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत करदात्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देणारे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या भारत मंडपम येथील जीएसटी कौन्सिलच्या (GST Council) 57 व्या बैठकीत व्यापारी आणि उद्योग जगतासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जीएसटी नियमांचे पालन सुलभ करण्यासाठी आणि कायदेशीर विवाद कमी करण्यासाठी या बैठकीत कौन्सिलने जीएसटी कायद्यांतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटक करण्याचे अधिकार (Power to Arrest) पूर्णपणे रद्द केले आहेत. या निर्णयामुळे देशभरातील व्यावसायिक आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जीएसटी रिफंड मंजूर करण्याची मुदत 15 दिवसांवरून थेट 10 दिवसांवर आणण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसायांना अडकलेला निधी तुलनेने लवकर उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, जीएसटी दरांच्या रचनेत सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरांशी संबंधित मुद्द्यांचा विचार आता वर्षातून एकदाच केला जाणार आहे. सरकारचा भर आता करदरांपेक्षा करव्यवस्था अधिक सुलभ, पारदर्शक आणि चेहरा-विरहित करण्यावर असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं.
GST Arrest Power Removed : खटला भरण्याची मर्यादा 1 कोटींवरून 5 कोटींवर
जीएसटी कौन्सिलने या बैठकीत व्यापाऱ्यांवरील कायदेशीर कारवाईची टांगती तलवार दूर करताना अनेक दिलासादायक निर्णय दिले आहेत:
जीएसटी कायद्यांतर्गत अधिकाऱ्यांकडे असलेले अटकेचे सर्व अधिकार मागे घेण्यात आले आहेत.
जीएसटी उल्लंघनाबाबत थेट खटला भरण्याची (Prosecution) मर्यादा 1 कोटी रुपयांवरून वाढवून थेट 5 कोटी रुपये करण्यात आली आहे.
गुन्ह्यांसाठी असणारी किमान शिक्षेची तरतूद हटवण्यात आली असून, आता दंड किंवा शिक्षेचे स्वरूप हे पूर्णपणे न्यायव्यवस्थेच्या (Judiciary) अधिकारात राहील.
GST General Penalty Reduced : सामान्य दंड 25 हजारांवरून थेट 10 हजार रुपये
छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देताना कौन्सिलने सामान्य दंडाच्या रकमेमध्ये मोठी कपात केली आहे. ज्या उल्लंघनासाठी पूर्वी कोणतीही दंडाची रक्कम निश्चित नव्हती, अशा प्रकरणात आधी थेट 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जात होता. जीएसटी कौन्सिलने हा दंड आता 10 हजार रुपयांवर आणला आहे.
GST Tax Recovery : कर भरण्यास उशीर करणाऱ्यांवर व्याज आणि दंड लागू
बैठकीत कौन्सिलने हेदेखील स्पष्ट केले आहे की, जे करदाते (Taxpayers) वेळेवर रिटर्न फाइल करणार नाहीत, कर भरण्यास उशीर करतील किंवा चुका करतील, त्यांच्याकडून कराची वसुली केली जाईल. अशा व्यापाऱ्यांवर व्याज आणि प्रमाणात दंड (Proportionate Penalty) आकारला जाईल. मात्र, केवळ कर उशिरा भरल्याच्या कारणावरून कोणतीही कठोर किंवा जाचक कारवाई केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीत कर दरांमध्ये (GST Rates) कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
ही बातमी वाचा:
Before You Go
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..





















