नक्सलबाडी... ज्या नक्सलवादानं आजपर्यंत हजारो बळी घेतले त्या नक्सलवादाचं उगमस्थान. सध्या प. बंगालच्या निवडणुका सुरू आहेत. या निमित्तानं एबीपी माझाचे प्रतिनिधी नक्सलबाडीत पोहोचले. आताची नक्सलबाडी कशी आहे? तिथले लोक या निवडणुकीत कुणाला पसंती देणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.


अमार बाडी नक्सल बाडीचा नारा देत, हक्काच्या लढाईसाठी सुरू झालेलं नक्षल आंदोलन आज देशासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. हे तेच नक्सलबाडी आहे जिथे नक्षलवादाची सुरुवात झाली. नक्षलवादाचं  विष किती पसरलं याचं उदाहरण म्हणजे नुकताच झालेला बिजापूरचा हल्ला. देशाच्या नकाशावरचं एक असं गाव ज्या गावातून पडलेली आंदोलनाची ठिणगी आजपर्यंत आग होऊन धगधगतेय.


वैचारीक मतभेदामुळे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षात 1964 साली फूट पडली. त्यातूनच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जन्म झाला. पण निवडणूक प्रक्रियेत याच पक्षाच्या ज्योती बसू यांनी सहभाग घेतल्यानं चारु मुजूमदार यांनी आपल्या गटाला सोबत घेऊन जनआंदोलन सुरू केलं. नक्सलबाडी आणि परिसरातल्या 50 गावांमधल्या मजूर आणि शेतकऱ्यांचं इथली प्रशासकीय व्यवस्था शोषण करते त्यामुळे बंदुकीच्या नळीतून चालणारी गोळीच त्यांना न्याय देऊ शकते असं चारु मुजूमदार यांचं म्हणणं होतं. त्यामुळे लेनीन आणि माओ त्से तुंगच्या विचारांनी प्रेरित होऊन चारु मुजूमदार यांनी माओवादी चळवळ उभी केली. नक्सलबाडीमधून या उठावाची ठिणगी पडली आणि या आंदोलनाला नक्षल आंदोलन अशी ओळख मिळाली. 


नक्सलबाडी गावात फिरताना आम्हाला चारु मुजूमदार यांचे सहकारी नक्षल नेता पवन सिंह भेटले. आंदोलन उभं करणाऱ्या कॉम्रेड मीटिंगमध्ये  पोलीसांनी एका गर्भवती महिलेवर गोळी झाडली. त्यानंतर आंदोलन हिंसक झालं.  नक्सलबाडीतलं आंदोलन पेटल्यावर अनेक जमीनदार, पोलीस, यांची गळा कापून हत्या करण्यात आली. पुढे चारु मुजूमदार पकडले गेले. आणि तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर ही नक्षल चळवळ त्यांचे सहकारी कानू सान्याल यांनी पुढे नेली.  


चहाच्या बागांमध्ये मजूरांचं शोषण करणाऱ्या जमीनदारांच्या विरोधात लढणाऱ्या चारु दा यांना सोबत दिली कानू सान्याल यांनी. पण रक्तपाताचा हा मार्ग कानू सान्याल यांना रुचला नाही. कानू दांच्या घरात सर्व कम्युनिस्ट नेत्यांचे फोटो आहेत मात्र चारू मुजूमदार यांचा फोटो नाहीय. आजची रक्तपात करणारी नक्षलवादी चळवळही इथल्या नेत्यांना मान्य नाही. 


स्टॅलिन, लेनीन, माओ, चारु मुजूमदार ज्यांनी नक्षलवादी आंदोलनाचं नेतृत्व केलं. देशातल्या अनेकांसाठी आज हे सर्व नेते काहींसाठी हिरो आहेत तर काहींसाठी व्हिलन. याच नेत्यांच्या विचारानं बंगाल ढवळून काढला. जल जमीन जंगलसाठीचं या आंदोलनानं काँग्रेसला इथे असा काही झटका दिला की काँग्रेस बंगालमध्ये परत उभी राहिली नाही.


पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला धक्का देऊन डाव्यांनी तब्बल 34 वर्ष राज्य केलं. त्यानंतर ममतांनी सत्ता काबिज केली. ममतांच्या काळात माटीबारी-नक्सलबाडी विधानसभा काँग्रेसच्या ताब्यात गेली. काँग्रेसचे संकर मालाकार सध्या इथले आमदार आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला डाव्यांची साथ आहे. अब्बास सिद्दिकी, डावे आणि काँग्रेस यांच्यावतीनं पुन्हा एकदा विद्यमान आमदार संकर मालाकार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गृहमंत्री अमित शाहा यांनीही नक्सलबाडीतल्या आदीवासीच्या घरी जेवण घेत भोजन नीती अवलंबली. भाजपच्या आनंदमोय बर्मन यांना उभं केलंय. तर तृणमुलकडून राजन सुंदास यांना संधी देण्यात आलीय.   


 नक्सलवादानं छत्तिसगड, गडचिरोली, तेलंगण, आंध्रप्रदेशातला काही भाग आजपर्यंत रक्तानं लाल केलाय. पण जल जमीन आणि जंगलसाठी लढलेली नक्सलबाडी आपली ओळख बदलू पाहतेय. तुर्तात नक्सलबाडीची ही जनता कम्युनिस्टांच्या हातात हात घेतलेल्या काँग्रेसला पुन्हा संधी देणार? ममतांना साथ देणार? की भाजपला पसंती देत डावीकडून उजवीकडे आपला वैचारीक प्रवास करणार? हे 2 मे रोजी स्पष्ट होईल.