ग्रेटर नोएडा : 2016 मध्ये बुलंदशहर हायवेवर झालेल्या गँगरेपच्या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. जेवर-बुलंदशहर हायवेवरुन जाणाऱ्या कारमधील कुटुंबावर दरोडा टाकण्यात आला. कारमधील एकाची हत्या
करण्यात आली असून महिलांवर गँगरेप झाल्याचा आरोप आहे.


बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी ग्रेटर नोएडातील जेवरहून संबंधित कुटुंब निघालं होतं. कारमध्ये चार महिला, तर चार पुरुष होते. रात्री दीड वाजताच्या सुमारास निर्मनुष्य रस्त्यावर आरोपींनी खिळे टाकले होते. त्यामुळे पीडित कुटुंबाला कार बाजुला थांबवावी लागली.

कार बाजुला थांबताच आरोपींनी कुटुंबावर हल्लाबोल केला. बंदुकीच्या धाकाने आरोपींनी मौल्यवान वस्तू आणि रोकड लुटली. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपींना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली.

कारमधील महिलांवर गँगरेप झाल्याची आरोप आहे, मात्र पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. लुटमारीला विरोध केल्यानंतर शकील कुरैशी यांची गोळी मारुन हत्या करण्यात आली. महिलांचे दागिने आणि 44 हजारांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

या प्रकारामुळे सहा महिन्यांपूर्वी याच हायवेवर झालेल्या लुटमारीच्या घटनेची आठवण ताजी झाली आहे.
गाझियाबाद आणि अलिगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या गँगरेपच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. कारला अडवून कुटुंबाला लुटत मायलेकीवर गँगरेप झाला होता.

संबंधित बातम्या :


राष्ट्रीय महामार्गावर कुटुंबाची लूट, मायलेकीवर गँगरेप


'माझ्या पत्नी-मुलीलाच त्या बलात्काऱ्यांना ठार मारु द्या'