नवी दिल्ली : काळ्या पैशांविरोधातील कारवाईत आयकर विभागाच्या हाती घबाड लागले आहे. आयकर विभागाने 400 पेक्षा अधिक अघोषित व्यवहारांचा छडा लावला आहे. तर 600 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये बँक खात्यांतील रकमेसोबतच जमीन फ्लॅट आणि दागिने आदींचा समावेश आहे.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 23 मे 2017 पर्यंत कोलकाता, मुंबई, दिल्ली या महानगरांसह गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये छापेमारी करण्यात आली. यात 400 आर्थिक अनियमिततांचा छडा लावण्यात आला. यावेळी 240 प्रकरणात अघोषित संपत्ती जप्त करण्यात आली असून, याची किंमत जवळपास 600 कोटी रुपये आहे. तर 40 प्रकरणातील 530 कोटीची संपत्ती अचल स्वरुपातील आहे.
आयकर विभागाच्या कारवाईत मध्यप्रदेशच्या जबलपूरमधील एका ड्रायव्हरच्या नावावर तब्बल 7.7 कोटीची जमीन असल्याचं उघड झालं. या जमीनीचा मालक मध्यप्रदेशमधील शेअर दलाल होता. तर मुंबईतल्या एका कारवाईत एका व्यक्तीने बोगस कंपनीच्या नावाखाली अघोषित संपत्ती गोळा केली होती.
राजस्थानच्या सांगनेरमध्ये एका सराफाने आपल्या कर्मचाऱ्याच्या नावाने संपत्ती दडवून ठेवली होती. तर कोलकात्यामधूनही अनेक ठिकाणी केलेल्या कारवाईत आयकर विभागाने कोट्यवधीची अघोषित संपत्ती जप्त केली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी केंद्र सरकारने Benami Transaction (Prohibition) ACT मध्ये सुधारणा करुन, नवीन कायदा नोव्हेंबर 2016 पासून अंमलात आणला. या कायद्यातील नव्या बदलानुसार दोषींना सात वर्षांचा तुरुंगवास आणि दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात दुसऱ्याच्या नावाने खरेदी केलेली स्थावर आणि जंगम संपत्तीवर कारवाईचे अधिकार आयकर विभागाला दिले आहेत.