नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून इलॉन मस्क भारतात आपल्या इलेक्ट्रिक कारच्या विक्रीसाठी प्रयत्नशील आहे. भारत सरकारने टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारवरील कर कमी करावा अशी मागणी टेस्लाच्या वतीनं करण्यात येत आहे. पण भारत सरकार या गोष्टीसाठी तयार नाही. टेस्ला जोपर्यंत त्यांचे उत्पादन भारतात सुरू करत नाही तोपर्यंत त्यांना कोणतीही सूट देण्यात येणार नाही असं केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी मंगळवारी स्पष्ट केलंय. इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ भारतात आणि रोजगार चीनमध्ये असं चालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
टेस्ला कंपनी दीर्घ काळापासून आपल्या इलेक्ट्रिक कार भारतात विक्रीसाठी उपलब्ध करण्याच्या प्रयत्नशील आहे. परंतु या कंपनीला भारत सरकारकडून कर सवलत हवी आहे. यावर केंद्र सरकारचे म्हणणं आहे की टेस्लाने भारतातच वाहने तयार करावीत, जेणेकरून भारतातही रोजगार निर्माण होऊ शकेल. परंतु टेस्लाने अद्याप यावर कोणताही विचार केला नसल्याने त्यांना भारतीय बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही.
सरकारच्या धोरणानुसार टेस्लाचे काम नाही
केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, जगातल्या सर्वच कंपन्यांना भारताची बाजारपेठा हवी आहे. पण या ठिकाणी त्यांना उत्पादन करायचं नाही. बाजारपेठ भारतात पण रोजगार चीनमध्ये मिळत असेल तर त्याला मान्यता देण्यात येणार नाही. या गोष्टी मोदी सरकारमध्ये होणार नाहीत. जर टेस्लाला भारतीय बाजारपेठ हवी असेल तर त्यांनी सरकारच्या धोरणानुसार रितसर अर्ज करावा.
भारतीयांना रोजगार हवा
टेस्ला भारत सरकारच्या धोरणांनुसार वागत नसल्याने हे स्पष्ट झालं आहे की टेस्लाला केवळ भारतीय बाजारपेठेचा फायदा घेऊन नफा कमवायचा आहे. पण त्यांना येथे उत्पादन युनिट स्थापन करायचे नाही. जर त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कार चीनमध्ये बनवल्या तर हजारो नोकऱ्या तिथे निर्माण होतील आणि भारतीय तरुण बेरोजगार राहतील असं केंद्रीय मंत्री म्हणाले.
आतापर्यंत 115 कंपन्या प्रतिक्षेच्या यादीत
भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी आतापर्यंत 115 कंपन्यांनी अर्ज केला असून त्या प्रतिक्षेच्या यादीत आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. यामध्ये 50 ते 65 कंपन्या या भारतीय आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha