नवी दिल्ली : देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी असून त्यांना आता मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुरु आहे. याचाच एक प्रयत्न म्हणून केंद्रीय कामगार मंत्रालयाने गुरुवारी ई-श्रम e-Shram पोर्टल (e-Shram Portal) सुरु केलं आहे. त्या माध्यमातून जवळपास 38 कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी ही घोषणा केली. 


देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असंघटित क्षेत्रातील 38 कोटी कामगारांची नोंदणी करण्यात येणार असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशातील बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, रोजंदारी कामगार आणि इतर सर्व प्रकारच्या असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे येणार आहे.  






अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखांचा विमा


ई-श्रम पोर्टलवर (e-Shram Portal) सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद करावी असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र सरकारकडून त्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांच्या विम्याचे कवच देण्यात येणार आहे. तसेच अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.


ई- श्रम पोर्टलवर (e-Shram Portal) नोंदणी कशी करणार?


सर्व प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना  eshram.gov.in या पोर्टलवर (e-Shram Portal) नोंदणी करता येणार आहे. यासाठी 14433 हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. या पोर्टलवर जाऊन कामगारांना आपली सर्व माहिती भरावी लागेल, सोबत आपल्या आधारचा आणि बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल. त्यानंतर संबंधित कामगाराला 12 अंकी युनिक नंबर असलेले ई-श्रम कार्ड देण्यात येईल. त्याच्या मदतीने या कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :