Intelligence Alert In J&K: तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता गुप्तचर संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये अफगाणिस्तानातून ड्रग्जची तस्करी वाढण्याचा इशारा दिला आहे. या अहवालानंतर, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कार्य दलाने सीमेपासून शहरापर्यंत पाळत ठेवणे आणि दक्षता वाढवली आहे.


आता तालिबानला अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आणि सरकार यशस्वी चालवण्यासाठी पैशांची गरज आहे. यावेळी जेव्हा जगाची नजर तालिबानवर असते आणि जगभरातील तालिबानवर निर्बंध लादले जात आहेत, अशा स्थितीत तालिबान पैशाची कमतरता पूर्ण करण्यासाठी ड्रग तस्करीला प्रोत्साहन देईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


जर आकडेवारीवर नजर टाकल्यास लक्षात येईल की, याआधी 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात होता तेव्हा अफगाणिस्तानमध्ये अफूचे उत्पादन शिगेला होते. आता असे मानले जात आहे की पैशांची कमतरता पूर्ण करण्यासाठी तालिबानने पुन्हा एकदा अंमली पदार्थांचं उत्पन्न वाढवलं आहे. तसेच हे ड्रग्स पाकिस्तानद्वारे भारतात पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल.


अफगाणिस्तानातून येत असलेल्या बातम्यांनंतर, जम्मू -काश्मीर पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सने सीमेवरून अफगाणिस्तानमध्ये संभाव्य अंमली पदार्थांच्या तस्करीवर नजर ठेवण्यासाठी एक अॅक्शन प्लान तयार केला आहे. युनायटेड नेशन्स ड्रग्स कंट्रोल ऑफिसच्या आकडेवारीनुसार:
- 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तानमध्ये प्रति हेक्टर अफूचे उत्पादन सर्वाधिक होते.
- अफगाणिस्तानचे 80 टक्के मोठे ड्रग्स विक्रेते तालिबानच्या समर्थनात आहेत.
- तालिबानचे 60 टक्के बजेट अफूच्या व्यवसायावर अवलंबून आहे.
- जगातील 90 टक्के अफूची लागवड अफगाणिस्तानमध्ये होते.
- तालिबान अफूमधून सुमारे 40 दशलक्ष डॉलर्स कमाई करतो, ज्याचा वापर शस्त्रे खरेदी करण्यासाठी केला जातो.
- अफगाणिस्तानमध्ये उत्पादित होणारे बहुतेक अफू हे हेल्मंद आणि कंधारमध्ये आहेत, जे सध्या तालिबानच्या ताब्यात आहेत.
- 2017 नंतर अफगाणिस्तानचा 37 टक्के भाग तालिबानच्या ताब्यात आहे, जिथे अफूची सर्वाधिक लागवड होते.


जम्मू -काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणा सतर्क


अफगाणिस्तानातून संभाव्य अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी या अॅक्शन प्लानअंतर्गत, बीएसएफ सेना सीमेवर दक्षता ठेवत आहे. जम्मू-काश्मीर पोलीस जम्मू काश्मीरच्या आतील भागात देखरेख करत आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स पारंपारिक मार्गावर लक्ष ठेवून आहे, जिथून ड्रग्जची खेप भारतात येण्याची शक्यता आहे. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने दावा केला आहे की पाकिस्तान ड्रोन्सचा वापर ड्रग्सच्या तस्करीमध्ये करू शकतो जे पाकिस्तानद्वारे पाठवले जाऊ शकतात. परंतु पाकिस्तानच्या बाजूने येणाऱ्या प्रत्येक अमली पदार्थ भारतीय सीमेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ठोस व्यवस्था करण्यात आली आहे.