नवी दिल्ली : ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्याची मागणी सरबजीत यांची बहीण दलबीर कौर यांनी केली आहे. भारत सरकारने कुलभूषण जाधव यांच्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे, असेही दलबीर कौर यांनी म्हटलं आहे.


"आपल्या सरकारने योग्य असलेली सर्व पावलं उचलावी. प्रसंगी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणावी.", असे दलबीर कौर म्हणाल्या.

"भारतातील तुरुंगांमध्ये अनेक पाकिस्तानी कैदी आहेत, ज्यांच्यावर अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत. मग त्यांच्याशीही तसंच वागावं का? 2000 सालच्या लाल किल्ल्यावरील हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानी आहे, त्याला फाशी झाली का?", असे सवाल दलबीर कौर यांनी पाकिस्तानला उद्देशून विचारले आहेत.

"मी माझ्या भावाला गमावलं आहे. त्यामुळे जाधव कुटुंब सध्या कोणत्या दु:खातून जात असेल, याची मला कल्पना आहे. मी जाधव कुटुंबासोबत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी. गरज भासल्यास पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी मी स्वत:ही सोबत येईन.", असेही दलबीर यांनी म्हटले.

प्रकरण काय आहे?

‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानी मीडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. रावळपिंडी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

कुलभूषण जाधव यांचं 2016 मध्ये इराणमधून अपहरण करण्यात आलं होतं. मात्र ते पाकिस्तानमध्ये कसे सापडले याचं उत्तर अजूनही पाकिस्तानने दिलेलं नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याने याची माहिती घेण्याचा अधिकार भारताला दिलेला आहे.

भारताने 25 मार्च 2016 ते 31 मार्च 2016 या काळात 13 वेळा पाकिस्तानच्या उच्च आयोगाला कुलभूषण जाधव यांच्याविषयी माहिती मागितली. पण पाकिस्तानने त्याला प्रतिसाद दिला नाही.

कोणत्याही वैध पुराव्याशिवाय कुलभूषण जाधव यांना फाशी देणं हास्यास्पद आहे. त्यांच्यावर खटला चालवला जातोय, याची माहिती देखील आतापर्यंत भारताला देण्यात आली नव्हती, अशा तीव्र शब्दात भारताने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत.

हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानात अटक केलेला भारतीय तरुण कुलभूषण जाधव विरोधात ठोस पुरावे नसल्याची कबुली पाकिस्तानने स्वतः दिली आहे. जाधवविरोधात कुठलेही निर्णायक पुरावे नसल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण सरताज अजीझ यांनी स्पष्ट केलं होतं.

मार्च महिन्यात बलुचिस्तानातून कुलभूषण जाधव यांना रॉ एजंट असल्याच्या आरोपातून पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. भारतीय हेर कुलभूषण जाधवबाबत असलेल्या कागदपत्रांमध्ये निव्वळ काही विधानं आहेत, कोणतेही पुरावे नाही, असं अजीझ यांनी पाकिस्तानच्या सिनेटमध्ये सांगितलं होतं.

कुलभूषण जाधव यांना कायद्याची पायमल्ली करुन फाशी देण्यात आली, तर ही पूर्वनियोजित हत्या समजली जाईल, असा स्पष्ट इशारा भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला दिला आहे.

कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ

यापूर्वी  पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओत कुलभूषण जाधव यांनी आपण रॉ एजंट असल्याचं मान्य केल्याचा दावा, पाकिस्तानने केला होता. मात्र भारताने या व्हिडीओच्या सत्यतेवर आक्षेप घेतला होता.

कोण आहेत कुलभूषण जाधव ?

जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात अटक झाली आहे.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो.’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.