Google Doodle Pani Puri : साधारणत: स्ट्रीट फूड (Street Food) म्हटलं की हमखास डोळ्यांसमोर येणारं नाव म्हणजे पाणीपुरी (Pani Puri). दक्षिण आशियाई भागातील हाच सर्वांचा आवडता पदार्थ आज गुगल डूडलद्वारे (Google Doodle) साजरा केला जातोय. यामागे एक खास कारण आहे. ते म्हणजे, 2015 साली याच दिवशी (12 जुलै) मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका रेस्टॉरंटने 51 विविध प्रकारचे पाणीपुरीतील पाणी देण्याचा विक्रम रचला होता. या रेस्टॉरंटने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलं आहे. 


पाणीपुरी, गोलगप्पा, पुचका अशा विविध नावांनी ओळख 


आज देशभरात पाणीपुरी खाल्ली जाते. असे असले तरी, पाणीपुरीची वेगवेगळी नावं आपल्याला प्रदेशानुसार पाहायला मिळतात. साधारण: कुरकुरीत पुरी आणि त्यात रगडा किंवा बटाटे त्यात विविध प्रकारचे मसाले आणि तिखट पाणी घालून केलेला हा पदार्थ महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये पाणीपुरी या नावाने ओळखला जातो. तर, पंजाब, जम्मू आणि काश्मीर आणि नवी दिल्ली या उत्तरेकडील राज्यांमध्ये, बटाटा आणि चणे-भरलेल्या ट्रीटला जलजीरा-स्वाद घालून पाण्यात बुडवून तो दिला जातो, याला 'गोल गप्पे' म्हणतात. पश्चिम बंगाल आणि बिहार तसेच झारखंडच्या काही भागांमध्ये पुचका नावाने ओळखले जाते. या ठिकाणी चिंचेचा कोळ पाणीपुरीबरोबर दिला जातो.  


पाणीपुरीचा शोध कसा लागला?


पौराणिक कथेनुसार, पाणीपुरीचा शोध द्रौपदीने महाभारत काळात लावला होता. कथा अशी आहे की, द्रौपदी पांडवांची पत्नी झाली तेव्हा पाचही भाऊ मर्यादित साधनांसह वनवासात राहत होते. द्रौपदीची सासू कुंतीने तिला उरलेली बटाट्याची करी आणि गव्हाचे पीठ वापरून पाचही पुरुषांची भूक भागेल असे काहीतरी बनवायला सांगितले. द्रौपदीने तळलेले कणकेचे छोटे तुकडे बटाटे आणि भाज्यांच्या मिश्रणात भरले. ज्यामुळे पांडवांची भूक भागली. तेव्हापासून पाणीपुरीचा शोध लागला असे म्हटले जाते. 


गुगलकडून खास टास्क


गुगलने डूडलच्या माध्यमातून एक गेम देखील आणला आहे ज्यामध्ये युजरला स्ट्रीट व्हेंडरला मदत करण्यास सांगण्यात आले आहे. या खास गेममध्ये पाणी पूर्णपणे वेगळ्या फ्लेवर्समध्ये असून ग्राहकांच्या चवीनुसार आणि मागणीनुसार पाणी बनवणाऱ्या व्यक्तीला मदत करण्याचे काम देण्यात आले आहे. तसेच, मित्र-मैत्रीणींबरोबर आजच्या दिवशी पाणीपुरी खाऊन तुम्ही या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता. 


महत्त्वाच्या बातम्या : 


ISKCON कडून संत अमोघ लिला दास यांच्यावर एका महिन्यासाठी बंदी; संपूर्ण प्रकरण नेमकं काय? वाचा सविस्तर