नवी दिल्ली: सोने खरेदीसाठी महत्त्वाचा मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेकडे पाहिलं जातं. मात्र यंदा अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतं.


येत्या 18 एप्रिलला अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे. त्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वाढले आहेत. सध्या सोन्यानं 32 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

त्यामुळेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त साधत सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.

गेल्या काही वर्षातील अक्षय्य तृतीयेचा सोन्याचा हा सर्वाधिक भाव आहे. तर चांदीचा भावही 40 हजार रुपये किलोवर गेला आहे.

अमेरिकेनं सीरियावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पश्चिम आशियाखंडात तणाव निर्माण झाला आहे.  त्याचा परिणाम सोन्या-चांदीवर होऊ शकतो. सोन्याचा भाव फक्त भारतात वाढलेला नाही. तर जगभरात सोन्याचे दर कडाडले आहेत.

गुंतवणूक

दहा वर्षांपूर्वी अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेल्या सोन्याचा भाव दुप्पट झाला आहे. मात्र गेल्या तीन वर्षात सोन्यातील गुंतवणुकीमुळे मिळणारा परतावा काहीसा घटला आहे.

सोनं खरेदी करावं का?

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिका-चीन यांच्यातील ट्रेड वॉर आणि सीरियावरील रासायनिक हल्ल्यांमुळे  जागतिक परिस्थिती अस्थिर आहे. मात्र हीच सोने खरेदीसाठी योग्य वेळ असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

सोने 900 रुपये महागणार?

सोने बाजारात अक्षय्य तृतीयेपूर्वीच तेजी पाहायला मिळतीय. दिल्लीत सोने 625 रुपये महाग होऊन, ते प्रति 10 ग्रॅम 32 हजार 100 रुपयांवर पोहोचलं आहे.

मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात आणखी 900 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. म्हणजेच दिल्ली बाजारात सोने 33 हजाराचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.

मागणी वाढल्याने गेल्याच आठवड्यात सोने 625 रुपयांनी महागलं होतं.