श्रीनगर: कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज स्थानिक न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी आम्हा सर्वांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मुख्य आरोपी सांझीरामने न्यायालयात केली. तसंच आम्हाला आरोपपत्र मिळालं नसल्याचंही आरोपींनी म्हटलंय.

न्यायालयाने मग आरोपींच्या वकिलांना आरोपपत्र देण्याचे आदेश पोलिसांना दिले.

बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकूण आठ आरोपी आहेत. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. त्यामुळे सात आरोपींना सत्र न्यायालयात आणि एका आरोपीला ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात आलं.

दरम्यान, आरोपींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत, नार्को टेस्टमध्ये सर्व काही सिद्ध होईल, असा दावा केला.

दुसरीकडे पीडितेच्या वकिलांना वारंवार धमकावण्यात येतंय. त्यामुळे हे  प्रकरण जम्मू काश्मीर राज्याबाहेरच्या न्यायालयात चालवण्यात यावं अशी याचिका पीडित कुटुंबियांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्याचप्रमाणे पीडित कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याची मागणीही केली. याप्रकरणी पुढची सुनावणी 28 एप्रिलला आहे.

शीख वकील

कठुआ गँगरेप आणि हत्येप्रकरणाला हिंदू-मुस्लिम वादाची किनार आहे. त्यामुळे हा वाद टाळण्यासाठी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती सरकारने सरकारी वकील म्हणून दोन शीख वकिलांची नियुक्ती केली आहे. हे वकील कोर्टात पोलिसांची बाजू मांडतील.

मुख्य आरोपीचा दावा

याप्रकरणातील मुख्य आरोपी सांझीरामने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. सांझीरामच्या मुलीनेही हे षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे.

“पीडित मुलगी ही हिंदू-मुस्लिम नव्हती. तिच्यावर बलात्कार झालेला नाही, तर तिची हत्या झाली आहे. त्याचा तपास सीबीआयने करावा, अन्यथा याप्रकरणात निर्दोष लोक अडकतील”, असा दावा सांझीरामच्या मुलीने केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार, हत्या प्रकरण

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

10 जानेवारीला मुलगी खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर तिची हत्या केली.

शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली.

17 जानेवारीला जंगलात तिचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याचा मुलगा विशालला अटक करण्यात आली.

संजी रामला मदत करणं आणि चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.

सुप्रीम कोर्टाकडून दखल

जम्मू-काश्मीरच्या कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. याप्रकरणी स्वत: सुप्रीम कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. तसंच  सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरमधील बार असोसिएशनला देखील नोटीस बजावली आहे.

पीडितेच्या वकिलांना कोर्टात येण्यापासून रोखणाऱ्या वकिलांविरोधात सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त करत बार असोसिएशनला नोटीस बजावली आहे. 19 एप्रिलपर्यंत या नोटीशीचं उत्तर सुप्रीम कोर्टाने मागितलं आहे.

कठुला गँगरेप आणि हत्येप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेण्यात यावी अशी मागणी सुप्रीम कोर्टातील वकिलांच्या एका समूहाने सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती  ए. एम. खानविलकर आणि डी. वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाकडे केली होती.  वकिलांच्या या मागणीनंतर सुप्रीम कोर्टानेही सुमोटो याचिका दाखल करुन घेतली.

संबंधित बातम्या

काश्मिरात चिमुकलीची बलात्कार करुन हत्या

कठुआ बलात्कार : फाशीसाठी पॉक्सोमध्ये बदल करणार : मेनका गांधी 

भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, असिफाच्या बलात्कारामागे पाकचा हात

देशाच्या मुलींना न्याय मिळेल, आरोपींना सोडणार नाही : मोदी

 कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरण : मुंबई-पुण्यात निषेध मोर्चा