पणजी : कोरोनाच्या संकटामुळं लागू करण्यात आलेल्या सर्वच निर्बंधांमुळे आता अनेक ठिकाणी पर्यटनावरही निर्बंध आले आहेत. किंबहुना काही ठिकाणी पर्यटन पूर्णपणे ठप्प झालं आहे. राज्यात एकिकडे महाबळेश्वरमध्ये स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेत पर्यटनास सशर्त परवानगी दिली असतानाच तिथं अनेकांच्या पसंतीचं ठिकाण असणाऱ्या गोव्यात मात्र चित्र काहीसं वेगळं आहे.
गोव्याचे समुद्रकिनारे, तिथल्या वाटा आणि मेजवानी तुम्हाला कितीही खुणावत असली, तरीही प्रत्यक्षात गोव्याच्या भूमीत जाण्यासाठी मात्र तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, येथील स्थानिक लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देण्यात येत नाही आणि लोकसंख्येचा जवळपास सर्व भाग लसीकरणाचा लाभ घेत नाही तोवर राज्यात पर्यटनावर असणारे निर्बंध कायम असणार आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यासंदर्भातील माहिती देत ही बाब स्पष्ट केली आहे. 30 जुलैपर्यंत गोव्यातील जनतेलं लसीकरण पूर्ण करण्याचा मानस गोवा सरकारनं ठेवला असून त्याच दिशेनं येथील आरोग्य यंत्रणा कामालाही लागली आहे. लसीचा पहिला डोस देण्याचं काम पूर्ण होत नाही, तोवर राज्यात पर्यटन सुरु करण्याचा कोणताही बेत नाही, असंच मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्टपणे सांगितलं. गोव्यात सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु असून, यामध्ये सर्व प्रौढांना लस देण्याचं आरोग्य यंत्रणेचं लक्ष्य आहे. तूर्तास 30 जुलैपर्यंत तरी गोव्यात पर्यटनावरील निर्बंध कायम असणार आहेत.
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! महाबळेश्वर, पाचगणी उद्यापासून सुरु, 'हे' नियम वाचा
दरम्यान, 2020 डिसेंबरमध्ये गोवा पर्यटन मंत्रालय आणि एका कंसल्टन्सी फर्मकडून देण्यात आलेल्या अहवालामध्ये कोरोनामुळं येथील पर्यटन व्यवसायाला झालेल्या नुकसानाचा आकडा किती असेल याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अहवालानुसार कोरोना संकटामुळं गोव्यातील पर्यटन व्यवसायाला तब्बल 2000 ते 2700 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो असं सांगण्यात आलं होतं.