मुंबई : सोशल माध्यमांमुळे एका रात्रीत संपूर्ण देशभरात पोहोचलेल्या दिल्लीतल्या 'बाबा का ढाबा'चे (Baba Ka Dhaba) मालक कांता प्रसाद (81 वर्षे) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. झोपेच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने तब्येत बिघडली असून कांता प्रसाद यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कांता प्रसाद यांचा मुलगा याने पोलिसांना सांगितले की, कांता प्रसाद यांनी गुरुवारी दारु पिल्यानंतर झोपेच्या गोळ्या खाल्या होत्या. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 11.15 च्या सुमारास सफदरगंज रुग्णालयातून झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेली एक व्यक्ती रुग्णालयात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. रुग्णालयात पोलिस पोहचल्यानंतर मालवीय नगर परिसरात बाबा का ढाबा चालवणारे कांता प्रसाद आढळले. तपासादरम्यान कांता प्रसाद यांच्या पत्नीने सांगितले की, 2020 साली मालवीय नगर परिसरात कांता प्रसाद यांनी एक हॉटेल सुरु केलं होतं ते आर्थिक नुकसानीमुळे नीट चालू शकले नाही.महिन्याला त्याचे भाडे 1 लाख रुपये होते आणि हॉटेलची कमाई 30 हजार रुपये होती. त्यामुळे काही दिवसातच हॉटेल बंद करण्यात आले.
लॉकडाऊनच्या पहिल्या लाटेत गोरगरीबांचे जे हाल झाले त्याचे हे बाबा म्हणजे जणू प्रतीक बनले होते. लोक जेवायलाही फिरकत नसल्याने त्यांची काय अवस्था झालीय हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. गौरव वासन नावाच्या यूट्युबरने त्यांचा व्हिडीओ बनवला आणि तो चांगलाच व्हायरल झाला. सोशल माध्यमावरुन लाखो रुपयांची मदत अवघ्या काही दिवसांत उभी राहिली. पण नंतर याच गौरव वासनवर बाबांनी पैसे लुटल्याचे आरोप केले आणि दोघांमधले संबंध बिघडले.
ढाबा, रेस्टॉरंट ते पुन्हा ढाबा हा सगळा नशीबाचा प्रवास करत कांता प्रसाद आता पुन्हा आपल्या मूळ जागी आले होते. आज तोच जुना ढाबा त्यांना रोजीरोटीसाठी मदत करत होता.