पणजी : मंगळवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य करत साऱ्यांचं लक्ष वेधलं. राज्यातील किनारी भागांमध्ये असणाऱ्या बीफच्या तुटवड्याची आपल्याला माहिती असून यावर सरकार लवकरच पावलं उचलत यासाठी काही व्यवस्था करेल असं ते म्हणाले.
मांस विक्रेत्यांच्या माहितीनुसार नाताळ अर्थात ख्रिसमस आणि नववर्षाच्या या दिवसांमध्ये बीफची मागणी वाढलेली असतानाच दुसरीकडे कर्नाटकातून होणाऱ्या गोमांसाच्या पुरवठ्याचं प्रमाण कमी झाल्यामुळंच गोव्यात हा तुटवडा जाणवू लागला आहे.
ऐन सण- उत्सवाच्याच दिवसांमध्ये गोव्यात जाणवणाऱ्या बीफस तुटवड्याची सरकारलाही कल्पना असून, यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून लवकरच मार्ग शोधण्यात येतील, असं सावंत म्हणाले. राज्यात बीफस उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवात साधताना दिली.
Animal Husbandry Department च्या अधिकाऱ्यांशी आपली बैठक झाली असून, या संकटावर मात करण्यासाठीच्या मार्गांवर यामध्ये चर्चा झाल्याचं ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी नेते आणि आमदार चर्चिल अल्मेडो यांनी या तुटवड्यावर उपाय म्हणून राज्यात असणाऱ्या Goa Meat Complex Ltd (GMCL) इथं पुन्हा एकदा कत्तलखाना सुरु करावा अशी मागणी केली.
भाजप शासित गोव्यामध्ये कत्तलखान्यांमधील कसाईंवर बंदी घालण्यात आली होती. पण, बैल आणि म्हैस यांचा वध करण्याची पवानगी काही प्रमाणपत्र प्राप्त कत्तलखान्यांना देण्यात आली होती. याचसंदर्भात वक्तव्य करत गुरुवारी मारगाओमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान, आपण शुक्रवारी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा करुन कत्तलखाने पुन्हा सुरु करण्यात यावेत अशी विनंती करु असं अल्मेडो यांनी स्पष्ट केलं.
जवळपास मागील पाच वर्षांपासून Goa Meat Complex Ltd (GMCL) इथं असणाऱा कत्तलखाना बंदच आहे. या ठिकाणी मांसविक्रीसाठी एकाच दिवशी २०० प्राण्यांचा वध करण्याची व्यवस्था आहे, अशीही माहिती अल्मेडो यांनी दिली.
याव्यतिरिक्त कर्नाटकातून कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास शेजारी असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातून प्राणी गोव्यात आणले जाऊ शकतात, असाही उपाय अल्मेडो यांनी सुचवला. कर्नाटकात नुकताच गोहत्या विरोधी कायदा पास करण्यात आला. त्यामुळंच त्याचे थेट पडसाद गोव्यात उठत असल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हा आता मांस तुटवड्याच्या प्रश्नावर गोवा सरकार नेमका काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.